
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छ भारत अभियान केल्यानंतर अनेकांनी फोटोपुरते अभियान राबवून हौस भागवली. मात्र, हे अभियान व्रत म्हणून स्वीकारणारे चंद्रपुरातील विनोद कुडकेलवार हे खरे स्वच्छतादूत ठरले आहेत.
शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील विनोद कुडकेलवार. रोज सकाळी आझाद बगिचात येणं आणि तेथील कचरा गोळा करून बगिचा स्वच्छ ठेवण्याचं काम ते गेली चार वर्षे करीत आहेत. कचरा उचलण्यासाठी वाकावं लागतं. यातून अंगी नम्रता भिनते. शिवाय हा एक व्यायाय असल्यानं शरीरही सुदृढ राहतं, असा त्यांचा यामागील तर्क आहे. चंद्रपुरातील तलावात पोहण्यासाठी नियमित जात असताना त्यांना तळ्यात आणि आजूबाजूला कचरा दिसू लागल्यानं ते अस्वस्थ झाले. त्यातच पंतप्रधानांनी देशात स्वच्छता अभियानही सुरू केलं. त्यामुळं या कामाला वाहून घेण्याचा निश्चय त्यांनी केला. आज त्यांचं हे काम पाहून कुणी हसतो, तर कुणी प्रभावितही होतो.
अंगात स्वच्छतेचा संदेश लिहिलेले जॅकेट, टोपीवर गाडगेबाबांचं चित्र असा वेष धारण करून कुडकेलवार रोज सकाळी स्वच्छतेसाठी बाहेर पडतात. कोण काय म्हणेल याची त्यांना पर्वा नाही. घरची चूल पेटवण्यासाठी एक छोटीशी प्रिंटिंग प्रेस आहे. त्यावरच मुला-मुलीचं शिक्षण करीत आहेत. पण स्वच्छतेच्या वेडानं भारावलेल्या कुडकेलवार यांना घरातूनही समर्थन मिळतं. एक समाजोपयोगी कार्य करीत असल्याचं समाधान त्यांना आहे. स्वच्छता सर्वांनाच हवी असते. पण ती करण्याची हिंमत कुणी दाखवत नाही. अशात एखादा व्यक्ती हे व्रत घेतो, हे नवलंच म्हटलं पाहिजे. कुणी वंदो-कुणी निंदो, याची पर्वा न करता व्रतस्थपणे ते ही समाजसेवा करत असतात.






























































