हवामान बदलामुळे केसांची वाट लागली! हेअर ड्रेसरचा अजब दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान बदलामुळे आपल्या एका ग्राहकाच्या केसांची वाट लागल्याचा अजब दावा एका हेअर ड्रेसर महिलेने केला आहे. या प्रकाराने मनस्ताप झाल्याने त्या ग्राहक तरुणीने अखेर केस कापून छोटे करण्याचा निर्णय घेतला आहे.

जॅकी रॉबेल्स असं या ग्राहक तरुणीचं नाव आहे. अमेरिकेत राहणाऱ्या या तरुणीने तुलुम या मॅक्सिकन पर्यटनस्थळी पिकनिकला जायचा बेत आखला होता. त्या पिकनिकला जायच्या आधी एक दिवस ती केस रंगवण्यासाठी तिच्या नेहमीच्या हेअर स्पामध्ये गेली. तिला आपल्या केसांचा रंग लालभडक करून हवा होता. तिच्या हेअर ड्रेसरने सांगितल्यानुरूप तिचे केस रंगवून दिले.

दुसऱ्या दिवशी जॅकी पिकनिकला निघून गेली. तिथे तिने प्रवासात खराब झालेले केस धुतले. धुतल्यानंतर तिला केसांच्या बाबतीतली एक भयंकर गोष्ट लक्षात आली. तिचे केस वेडेवाकडे कापल्याप्रमाणे दिसत होते. त्यांचा पोत अतिशय खराब झाला होता. एखादा हेअर कलर आणि स्टाईल चुकावी त्याप्रमाणे तिचे केस दिसू लागले. तिला या प्रकाराने धक्का बसला.

पिकनिक संपवून ती घरी आली तेव्हा तिने पुन्हा त्या स्पाला भेट दिली. तिथे त्या संबंधित हेअर ड्रेसरकडे केसांच्या अशा अवस्थेबाबत तिने जाब विचारला. तेव्हा जॅकीला हेअर ड्रेसरने हवामान बदलामुळे केस खराब झाल्याचं कारण दिलं. हे उत्तर ऐकताच जॅकी चक्रावली. अखेर तिने स्वतःचे केस काळ्या रंगात रंगवून घेतले आणि कापूनही टाकले.

हा अनुभव जॅकीने सोशल मीडियावर शेअर केला असून तिने आपल्या केसांचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्या फोटोंवर प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी ते फोटो पाहून तिला तिचे केस आधीच खराब झाले होते, मात्र हेअर ड्रेसरने त्याची कल्पना न देता ते रंगवले, म्हणून ते तुटले, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी हेअर ड्रेसरने आपली चूक लपवण्यासाठी हे खापर हवामान बदलावर फोडल्याचं म्हटलं आहे.