सिंहगडावर दरड कोसळून गिर्यारोहकचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सिंहगडावरील कल्याण दरवाजा परिसरात दरड कोसळून झालेल्या अपघातात गिर्यारोहकाचा मृत्यू झाला. हेमंग धीरज गाला (वय 31, रा. मित्रमंडळ चौक, पर्वती) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. सिंहगडावर शनिवारी एपिक ट्रेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कल्याण दरवाज्याजवळील पायवाटेने स्पर्धेक गडावर येत होते. सकाळी नऊच्या सुमारास गडावर दाट धुके होते. त्यावेळी कल्याण दरवाजा परिसरातील डोंगराचा काही भाग अचानक कोसळल्याने हेमंग जखमी होत दरीत पडला. स्पर्धेची वेळ संपल्यानंतर हेमंग घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता त्याने काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे वडील गडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीत पोहोचले. तेव्हा पायथ्याला हेमंगची गाडी आढळली. त्यांनी स्पर्धेच्या संयोजकाशी संपर्क साधला. हवेली पोलीस ठाणे तसेच वनिवभागाला या घटनेची माहिती कळविण्यात आली.

वन विभागाचे पथक आणि स्थानिकांनी हेमंगचा शोध सुरू केला. शोधमोहिमेत सहभागी झालेल्या पथकाने हेमंगचा शोध सुरू केला. तेव्हा मातीच्या ढिगाऱ्याखाली हेमंग दबलेला असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात पाठविला आहे..