कल्याण-डोंबिवलीच्या मैदानांवरील फेरीवाल्यांचा ‘बाजार’ बंद करा; शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कल्याण-डोंबिवली पालिकेची मैदाने व उद्याने आठवडी बाजार व फेरीवाल्यांच्या व्यवसायासाठी उपलब्ध करून देऊ नयेत, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन देऊन तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली.

६ फेब्रुवारी रोजी कल्याणच्या यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे ‘हिंदुहृदयसम्राट श्री’ २०२६ शरीरसौष्ठव स्पर्धेच्या दिवशी मैदानात भाजी विक्रेत्यांनी स्टॉल लावण्याचा प्रयत्न केला आणि आयोजकांशी वाद घातला. मुळात आम्ही कायदेशीर भाडे भरून मैदान वापरत असताना त्याच ठिकाणी भाजी बाजार भरवण्याचा प्रकार निषेधार्ह आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली स्थानिक भाजी विक्रेतेच मार्केटच्या दराने माल विकून नफा मिळवत असून यात शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसल्याचाही आरोप विजय साळवी यांनी निवेदनात केला आहे. या व्यवहारामागे काही दलाल व तथाकथित समाजसेवक अर्थकारण करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महापालिकेने या गंभीर विषयात तातडीने हस्तक्षेप करून मैदाने व उद्याने केवळ क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांसाठीच राखीव ठेवावीत, तसेच कोणत्याही प्रकारचा व्यावसायिक वापर होऊ नये अन्यथा आंदोलनाचा इशारा साळवी यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

खेळाडूंवर अन्याय
अनेक भूखंड खेळाची मैदाने व उद्याने यासाठी आरक्षित ठेवली आहेत. या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून क्रीडा सुविधा, व्यायाम साहित्य तसेच नागरिकांच्या करमणुकीसाठी उद्याने विकसित करण्यात आली आहेत. मात्र या जागांचा वापर क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांऐवजी व्यावसायिक कारणांसाठी होत असल्याने खेळाडू व क्रीडाप्रेमींवर अन्याय होत असल्याचे विजय साळवी यांनी निवेदनात नमूद केले आहे.