किन्नौर कैलाश यात्रा मार्गावर ढगफुटी, ITBP ने 413 यात्रेकरुंना सुरक्षित स्थळी हलवले

हिमाचल प्रदेशात सध्या पडत असलेल्या पावसामुळे, किन्नौर जिल्ह्यातील टांगलिंग भागात किन्नौर कैलास यात्रा मार्गावर ढगफुटीमुळे मोठी हानी झाली आहे. ट्रॅकचा मोठा भाग वाहून गेल्याने शेकडो यात्रेकरू अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ता बंद असल्याने किन्नौर कैलास यात्रा पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस (ITBP) च्या 17 व्या बटालियनच्या पथकाने दोरीवर आधारित ट्रॅव्हर्स क्रॉसिंग तंत्राचा वापर करून, आतापर्यंत 413 यात्रेकरूंना वाचवले आहे. या सर्व यात्रेकरुंना आता सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. रिब्बा नाल्यात पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग 15 मीटरपर्यंत कोसळला आहे आणि सांगला खोऱ्यातील 4 नाल्यांमध्ये पुरामुळे 2 पादचारी पूल वाहून गेले आहेत.

या बचाव कार्यात 1 राजपत्रित अधिकारी, 4 उप-ऑर्डिनेट अधिकारी आणि ITBP टीम आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या 1 टीमसह 29 इतर पदांचे अधिकारी समाविष्ट आहेत. बुधवारी (6 ऑगस्ट) सकाळी, किन्नौर जिल्हा प्रशासनाला या मार्गावर प्रवासी अडकल्याची माहिती मिळाली, त्यानंतर आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या संयुक्त बचाव पथकांनी पुन्हा घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केले. जिल्हा प्रशासन आणि इतर एजन्सींच्या समन्वयाने आयटीबीपी सतत मदत आणि बचाव कार्य करत आहे. हिमाचल प्रदेशातील अनेक भागात बुधवारी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हिमाचलमध्ये 11 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.