‘ढगांमुळे रडारच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पडतो’- एअर मार्शल नाम्बियार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवादी तळावर हल्ला केला होता. जैश-ए-मोहम्मदच्या ठिकाणांवर केलेल्या एअर स्ट्राईकबाबत बोलताना मोदींनी एका मुलाखतीमध्ये रडारबाबत वक्तव्य केले होते. आता यावर एअर मार्शल रघुनाथ नाम्बियार यांनी याबाबत वक्तव्य केले आहे आणि आकाशात ढग जास्त असतील तर रडारच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पडतो, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

वेस्टर्न एअर कमांडचे कमांडिंग इन चीफ रघुनाथ नाम्बियार यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. ‘आकाशामध्ये मोठ्या प्रमाणात ढग असतात तेव्हा परिस्थिती बदलते. अशा स्थितीमध्ये काही प्रमाणात रडारच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आणि योग्य प्रकारे काम करू शकत नाही’, अशी माहिती एअर मार्शल रघुनाथ नाम्बियार यांनी दिली आहे. याचसंबंधात लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनीही विधान केले होते.

लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत म्हणाले की, ढगांमुळे रडारची कार्यक्षमता कमी होते. त्याच्या कार्यपद्धतीमुळे ते मोठ्या प्रमाणात असणाऱ्या ढगांपलिकडील वस्तू (विमान किंवा धातू) डिटेक्ट करू शकत नाही. तसेच वेगवेगळ्या टेक्नोलॉजीने कार्य करणारे विविध प्रकारचे रडार आहेत. काहींमध्ये ढगांच्या पलीकडे पाहण्याची क्षमता असते तर काहींमध्ये ढगांच्या पलिकडे पाहण्याची क्षमता नसते. कधी-कधी असे होऊ शकते, तर कधी-कधी नाही.

मोदी झाले होते ट्रोल

याआधी एका मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राईकबाबत बोलताना ढगांमुळे रडारच्या क्षमतेवर परिणाम होतो असे विधान केले होते. यावरून त्यांना ट्रोलही करण्यात आले होते. परंतु आता खुद्द लष्करप्रमुख आणि एअर मार्शल असे होऊ शकते, असे म्हणत आहेत. त्यामुळे मोदींच्या वक्तव्यावरील चर्चेला पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे.