मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरलाच नव्हता – फडणवीस

1701
Devendra fadanvis chief minister maharashtra

लोकसभा निवडणुकीवेळी समसमान जागांबाबत चर्चा झाली होती. मात्र आलेल्या जागांची आकडेवारी पाहता त्या गणितानुसारच जावे लागणार आहे. शिवसेनेला कोणती पदे द्यायची हे चर्चेला बसल्यानंतर मेरिटवरच ठरवू. आम्ही कोणतीही आडमुठी भूमिका घेणार नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, मात्र त्याबाबत कोणताही शब्द दिलेला नाही किंवा निर्णयही झालेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांच्या स्नेहसंमेलनावेळी अनौपचारिक गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांना शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या निर्णयाचे काय? शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देणार का, असे प्रश्न विचारण्यात आले असता मुख्यमंत्री म्हणाले, आदित्य ठाकरे यांना कोणते पद द्यायचे हे शिवसेनाच ठरवेल. मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता, मात्र या प्रस्तावावर कोणताही निर्णय किंवा आश्वासन देण्यात आले नाही. याबाबत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही बोललो असता त्यांनीही अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी शिवसेनेसोबत जाणार नाहीत हे स्पष्ट केले आहे. उलट आम्हीच शिवसेनेसोबत जाणार आहोत. शिवसेनेला सोबत घेऊन सरकार स्थापन करू. पुढील पाच वर्षांत चांगले, स्थिर आणि सक्षम सरकार निश्चितपणे महाराष्ट्राला देऊ. काहीही बातम्या येत असल्या तरी काही काळजी करण्याचे कारण नाही. भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल. उद्याच बैठक असल्यामुळे सरकारमध्ये भाजपचा गटनेता कोण असणार हे स्पष्ट होईल, असे सांगतानाच उद्या अमित शहा मुंबईत येणार नाहीत, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

एकत्रित सरकार स्थापन करणार
एकत्रित निवडणुका लढल्या नसत्या तर जागा वाढल्या असत्या का, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, राजकारणात जर तरला महत्त्व नसतं. लोकसभेत ठरवलं एकत्र लढायचं; एकत्र लढलो. त्यानुसार आम्ही एकत्रितच सरकार स्थापन करणार. महायुतीला चांगला जनादेश मिळालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे येत्या काही दिवसांत सरकार स्थापन करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

भाजपचा स्ट्राइक रेट चांगला राहिला
निवडणुकीत काही ठिकाणी यश आले तर काही ठिकाणी अपयश आले. काही जागा आणखी येऊ शकल्या असत्या, काही कारणांमुळे त्या आल्या नाहीत, मात्र या निकालामुळे समाधानी आहे. आमचा स्ट्राइकरेट चांगला राहिला आहे. 1990 नंतर मागील 30 वर्षांत इतका मोठा स्ट्राइक रेट महाराष्ट्रात कुणाचाही राहिलेला नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जनतेने मोठा विश्वास आमच्यावर दाखवला आहे. आम्ही फर्स्ट मेरिटमध्ये येणार होतो, मात्र आम्ही फर्स्ट क्लास फर्स्टमध्ये आलो. मात्र फर्स्ट क्लास फर्स्टमध्ये आलो याची चर्चा होण्यापेक्षा फर्स्ट मेरिटमध्ये आलो नाही याचीच चर्चा केली जात आहे, असे ते पुढे म्हणाले.

काकडेच माझ्या संपर्कात नाहीत
शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत असे वक्तव्य संजय काकडे यांनी केले आहे यावर आपले मत काय असे मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, ते असे म्हणालेत ते मला माहीत नाही. विशेष म्हणजे संजय काकडेच माझ्या संपर्कात नाहीत.

निवडून आलेल्या बंडखोरांना सोबत घेणार
दहा आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहेत. हा आकडा 15 पर्यंत जाणार आहेत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावर बंडखोरांबाबत काय भूमिका असे मुख्यमंत्र्यांना विचारताच ते म्हणाले, बंडखोर जर स्वगृही परत येत असतील तर आम्ही त्यांना का लोटायचं? ते जर निवडून येत असतील तर ते आमचं अंदाज लावण्यातलं अपयश आहे. त्यामुळे त्यांना आम्ही सोबत घेणार.

‘सामना’तील टीकेबद्दल नाराजी
‘सामना’ वाचायला सुरुवात केली नाही, पण त्यात जे काही येतं ते लोक मला सांगतात. पण ज्याप्रकारे लिहिलं जात आहे त्याबद्दल खूश नाही. त्याविषयी 100 टक्के नाराजी आहे. जे काँग्रेस बोलत नाही, राष्ट्रवादी बोलत नाही अशा गोष्टी लिहिण्याचं कारण नाही. एवढय़ा ताकदीनं त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लिहून दाखवावं. तरीही त्यांना अधिक महत्त्व देत नाही. पण एकत्र निवडणुकीला सामोरे जातात आणि निवडून येतात, तरीही असं बोलतात हे लोकांनाही पसंत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

आदित्य ठाकरेंसोबत काम करायला आवडेल
मुख्यमंत्री असल्याने मी अनेकांशी जुळवून घेतले आहे. माझ्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना मोठी जबाबदारी दिली गेली तर माझी काही हरकत नाही. आदित्य हे फार चांगले गृहस्थ आहेत. त्यांच्या सोबत काम करायला आवडेल. त्यांच्याशी काम करताना काही अडचणी येणार नाहीत आणि आल्या तरी मी त्या आपल्या पद्धतीने हाताळू शकतो. आदित्यच नव्हे कोणासोबतही काम करताना मला काही अडचण नसल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

आज भाजपची बैठक
भाजपची उद्या दुपारी 1 वाजता विधानभवन येथे बैठक होणार आहे. या बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड होणार आहे. या बैठकीला भाजपच्या प्रमुख नेत्यांसह निरीक्षक म्हणून दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि भाजपचे अविनाश राय खन्ना हे निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पावसात भिजण्याचा अनुभव कमी पडला
निवडणूक प्रचारावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अक्षरशः पावसात भिजले. यामुळे भावनिक आवाहन झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा लाभ झाला याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ‘पावसात भिजावं लागतं आणि पावसात भिजल्याने फायदा होतो याबाबत आमचा अनुभव कमी पडला,’ असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. यावेळी एकनाथ खडसे आत्मचरित्र लिहिताहेत आपण लिहिणार का, असे विचारले असता योग्य वेळी लिहीन. माझ्यावर अजून ती वेळ यायची आहे, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या