भंडारा-गोंदिया निवडणूक पावसाळय़ानंतर व्हायला हवी होती!

10

सामना प्रतिनिधी । मुंबई

भंडारा-गोंदियाची निवडणूक पावसाळय़ानंतर झाली असती तर तेथे वेगळे चित्र दिसले असते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हणाले. ते भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. भंडारा-गोंदियातील पराभव मान्य करताना २०१९ मध्ये तेथे आमचाच उमेदवार जिंकून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

युतीबाबत शिवसेनेनेच निर्णय घ्यावा
भाजप युतीच्या बाजूने असली तरी युती ही एकतर्फी होत नाही. आता युतीबाबत शिवसेनेने भूमिका घ्यायला हवी, आमच्याकडून कोणतीच हरकत नाही असे सांगतानाच ज्यावेळी जशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी तसे निर्णय घेतले जातील अशी भूमिकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली.

निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी
पालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीमध्ये मतदानाच्या दिवशी बंद पडलेल्या ‘ईव्हीएम’ आणि ‘व्हीव्हीपॅट’ मशीन्ससंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आयोगाला जबाबदार धरले आहे. मतदान यंत्रे बंद पडल्याने अनेक मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे सांगत त्याचा भाजपला फटका बसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र काही पक्षांनी ईव्हीएम बंदबाबत आम्हाला जबाबदार धरले. ईव्हीएममध्ये भाजपाने घोटाळा केल्याचा आरोप आमच्यावर झाला. जर तसे करता आले असते तर पालघरमध्येच का विजय झाला, भंडारा-गोंदियामध्येही झाला असता. एवढेच नव्हे तर कर्नाटकमध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळवता आले असते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मात्र ज्या ठिकाणी ईव्हीएम बंद पडले तेथे निवडणूक अधिकाऱयांनी वेळ वाढवून द्यायला हवा होता. पण तेथे दुर्लक्ष केले. निवडणूक आयोग याची गंभीर दखल घेऊन निश्चित कारवाई करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या