पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या ‘जेलर’सारखी झालीय, मुख्यमंत्र्यांचे शरसंधान

1273

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांच्या धडाक्यामुळे आता खरी रंगत येत आहे. गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फलटण येथे जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तसेच सुशीलकुमार शिंदे यांनी नुकत्याच केलेल्या ‘थकलेल्या’ वक्तव्याचाही समाचार घेतला.

मुख्यमंत्री म्हणाले, निवडणुकीत आमच्या समोर विरोधकच नाहीत. लहान मुलाला विचारले तर तोही सांगतो की महायुतीचेच सरकार येणार ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, माती लावून आखाड्यात उतरले आहेत. मात्र प्रतिस्पर्धी पक्षाचे पैलवान आखाड्यात उतरायलाच तयार नाहीत. राहुल गांधींना ठाऊक आहे की निवडणूक काँग्रेस हरणार आहे त्यामुळे ते बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत.

राष्ट्रवादीनेच काँग्रेसला गिळले, तोच खरा शत्रू, काँग्रेस नेत्याची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री म्हणालेकी, शरद पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी झाली आहे. ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ बाकी बचे मेरे पिछे आओ’, असे शरद पवार म्हणत आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यामागे कुणीही नाही असा टोलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

‘थकलेल्या’ विधानाचा घेतला समाचार
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस थकलेले आहेत असे विधान केले होते. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे हे द्रष्टे नेते आहेत. त्यांना निवडणुकीनंतर काय होणार आहे ते समजले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था अशी होणार की विरोधी पक्ष नेताही त्यांना निवडता येणार नाही. कारण विरोधी पक्ष नेता निवडायचा असेल तर 10 टक्क्यांपेक्षा जास्त जागा मिळवाव्या लागतात. पण तेवढ्याही जागा मिळणार नाही ही खात्री पटल्यानेच सुशीलकुमार शिंदे विलिनीकरणाची भाषा करत आहेत असाही टोला फडणवीस यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या