काँग्रेसचे कच्चेबच्चे सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागतात! मुख्यमंत्र्यांचे खणखणीत प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

‘‘देश चालविण्यासाठी 56 पक्ष नव्हे तर 56 इंचांची छाती लागते,’’ असा टोला लगावतानाच, ‘‘काँग्रेसचे कच्चेबच्चे ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरवा मागत आहेत. सैन्याकडे पुरावा मागणाऱ्यांनी चुल्लूभर पाण्यात बुडून आत्महत्या केली पाहिजे,’’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. ‘‘शिवसेना-भाजप युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे. त्याला कोणी तोडू शकत नाही. शिवसेना-भाजपची युती हिंदुत्ववादी विचारांची युती आहे. हिंदुत्ववाद जाती-धर्माच्या पलीकडील आहे,’’ असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘या सभेला लोकांचा सागर दिसत आहे. पण हा सागर नाही, तर हा महासागर आहे. मुंबईत अरबी महासागर आणि आज कोल्हापुरात जनतेचा महासागर आला आहे. या गर्दीने लोकसभा निवडणुकीचा निकाल दिला आहे. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले कोल्हापूर हे शक्तिपीठ आहे. शाहू महाराजांनी ज्या कोल्हापुरातून देश बदलण्यासाठी चळवळ सुरू केली, त्याच कोल्हापुरातून आम्ही आमचा प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षांत देशात परिवर्तन झाले आहे. 56 पक्षांच्या भरवशावर देश चालत नाही. देश चालविण्यासाठी 56 इंचांची छाती आवश्यक आहे. 56 पक्षांची युती म्हणता; पण खरं पाहिलं तर 56 पक्ष रजिस्टर तरी आहेत का?’’ असा टोला काँग्रेस-राष्ट्रवादीला लगावला. ‘‘शिवसेना-भाजप युती म्हणजे फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे. त्याला कोणी तोडू शकत नाही. काँग्रेस सरकारच्या कालावधीत केवळ काँग्रेसच्या नेत्यांचीच गरिबी हटली. सामान्य माणूस खितपत पडला.

शिवसेना-भाजपची युती विचारांची आहे. ही हिंदुत्ववादी विचारांची युती आहे. हिंदुत्ववाद जाती-धर्माच्या पलीकडील आहे. ज्यांचे मातृभूमीवर प्रेम आहे, त्या प्रत्येकाला सोबत घेऊन हिंदुत्व चालतो. केवळ पक्षाच्या नावात ‘राष्ट्रवादी’ असून काही उपयोग नाही; मनाने राष्ट्रवादी लागतो. कॅप्टन शरद पवार यांनी माढय़ातून माघार घेतलीय. आता ते ‘नॉन-स्ट्राईकर’ बारावे खेळाडू म्हणून काम करीत आहेत. आम्हाला विदर्भात वाटायचं, सर्व पैसा पश्चिम महाराष्ट्रात जातो; पण आता समजलं की, सर्व पैसा काँग्रेस नेते आणि त्यांच्या नातेवाईकांच्या तिजोरीत गेला. आमच्या चार वर्षांच्या काळात एफआरपीकरिता कोणाला आंदोलन करावे लागले नाही.’’

‘‘काँग्रेस-राष्ट्रवादीला माझे खुले आव्हान आहे, 15 वर्षांतील विकासकामांचे आकडे घेऊन त्यांनी यावे आणि आम्ही साडेचार वर्षांचे आकडे घेऊन येतो. तुम्ही 15 वर्षांत जेवढी कामे केली नाहीत, त्यापेक्षा जास्त कामे आम्ही साडेचार वर्षांत केली आहेत.’’ भाजप इव्हेंट करतंय, या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या टीकेचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले, ‘‘आम्ही इव्हेंट करतोय; पण तुम्ही तर ‘भ्रष्टाचार मॅनेजमेंट’ करीत आहात. सॅम पित्रोदा यांनीसुद्धा पुलवामा हल्ल्याबाबत आणि ‘एअर स्ट्राईक’बाबत शंका उपस्थित केली. त्यांना आमच्या लष्कराबद्दल संवेदना नाहीत, पाकिस्तानबाबत संवेदना आहेत. आमच्या सेनेने पाकिस्तानात जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ही ताकद फक्त मोदींमध्ये होती, काँग्रेसमध्ये नव्हती. काँग्रेसचे कच्चेबच्चे ‘सर्जिकल स्ट्राईक’चा पुरावा मागातात,’’ अशी टीका त्यांनी केली.

बारामतीच्या पोपटाला सांगतो, तुमचे काही शिल्लक राहिले नाही
‘‘बारामतीच्या पोपटाला मी एवढंच सांगू इच्छितो की, तुमचं आता काही शिल्लक राहिलं नाही. राज्यात तर वाट लागलीच, मुंबई महापालिकेतही उद्धव ठाकरेंनी उरलासुरला तुमचा लंगोट उतरविला. तुम्ही सुपारी घेऊन काम करण्यापेक्षा दुपारी घरी बसून नरेंद्र मोदींना पंतप्रधान होताना पाहा. मोदी सूर्यासारखे आहेत. सूर्याकडे बघून थुंकले, तर ती थुंकी आपल्यावर येते,’’ असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

रासप युतीसोबतच राहणार – महादेव जानकर
आम्ही पडत्या काळातसुद्धा तुमच्यासोबत होतो. आताही देशासाठी सेफ आणि सिक्युरिटी म्हणून हृदयापासून शिवसेना-भाजपबरोबर प्रामाणिकपणे रासप आणि कार्यकर्ते राहतील अशी ग्वाही दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

तुफान गर्दी
महायुतीच्या सभेला आजच्या न भुतो न भविष्यति अशी गर्दी झाली होती. तपोवन मैदानात बसण्यासाठी लावलेल्या सर्व खुर्च्या भरल्या होत्या. त्यामुळे लोकांना रस्त्यावर उभे राहून सभा ऐकावी लागत होती. अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मैदानाभोवती लावलेले सर्व पडदे काढून टाकण्यास सांगितले. त्यानंतर उभे राहिलेल्या लोकांना सभा पाहायला मिळाली.

निवडून आणूया कमळ आणि धनुष्यबाण – रामदास आठवले
चारोळ्यांच्या माध्यमातून लोकसभेला रिपाइंसाठी जागा सोडली नसल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त करताना दोन्ही काँग्रेसचेही चांगलेच वाभाडे काढले. ‘घ्या तुम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आण… निवडून आणूया कमळ आणि धनुष्यबाण…’ अशी सुरुवात करून त्यांनी यावेळी अनेक कोपरखळ्या मारल्या. ‘देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चांगली जमली आहे जोडी, पण माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी…’, ‘तुमच्या गावाचे नाव कोल्हापूर… हा पाहा गर्दीचा महापूर…’ यांसह अनेक चारोळ्यांतून राहुल गांधी ते शरद पवारांवरही टीकास्त्र्ा सोडले.

दहा चौकांत सभेचे लाइव्ह प्रक्षेपण
महायुतीच्या सभेचे तपोवन मैदान गर्दीने खचाखच भरले होते. नागरिकांना बसण्यासाठी जागा नव्हती. हजारो लोक उभे होते. कोल्हापूर शहरातील दहा चौकांमध्ये या सभेचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. तेथेही नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती.

पाच हजार शिवसैनिकांची रॅली
महायुतीच्या सभेच्या निमित्ताने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच हजार शिवसैनिकांची भगवी रॅली काढण्यात आली. शिवसैनिक या रॅलीद्वारे शहरातून तपोवन मैदानाकडे आले.

पश्चिम महाराष्ट्रात युतीची सुनामी येणार – खोत
सदाभाऊ खोत म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात युतीची सुनामी येणार आहे. कोल्हापूर जिह्यातील दोन्ही जागा ताकदीने लढून जिंकणार आहे. जी मंडळी काँग्रेस–राष्ट्रवादीच्या हातात हात घालून गेली आहे त्यांना त्यांची जागा दाखवणार असा टोला खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. साखर कारखानदार काटा मारत आहेत असे म्हणणारेच आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांचा काटा यावेळी काढायचा आहे. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका, असे खोत यांनी सांगितले.

मिस्ड कॉल द्या, महायुतीशी जोडले जा
शिवसेना-भाजप-रिपाइं या महायुतीच्या मेळाव्यासाठी अतिशय आकर्षक पद्धतीने व्यासपीठ सजविले होते. डिजिटल स्क्रीनही लावण्यात आले होते. या मेळाव्याच्या सुरुवातीलाच 9650944945 या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल द्या, महायुतीशी जोडले जा, असे आवाहन करण्यात आले.

शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, केंद्रीय मंत्री अनंत गीते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, युतीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक गिरीश बापट, शिवसेना उपनेत्या, आमदार, डॉ. नीलम गोऱहे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते, सांगली, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे, खासदार संजयकाका पाटील, खासदार संजय काकडे, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार उल्हास पाटील, आमदार सत्यजीत पाटील, भाजपचे प्रदेश सरचिटणीस, आमदार सुरेश हळवणकर, आमदार अमल महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, शहरप्रमुख शिवाजी जाधव, रविकिरण इंगवले, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, हिंदुराव शेळके, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.