
सामना प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील 25 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करून सर्वांना 2022 पर्यंत हक्काचे घर देणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘अटल बांधकाम कामगार आवास योजने’चा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले, बांधकाम कामगार देश आणि राज्य निर्माण करण्यात आघाडीवर आहेत. अटल बांधकाम कामगार आवास योजनेच्या माध्यमातून कामगारांना हक्काचे घर देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. राज्य शासन पंचवीस लाख बांधकाम कामगारांची नोंदणी करणार असून पाच वर्षात सर्वांना घरे देण्यासाठी कटिबद्ध आहे.
कामगारांच्या हितासाठी साडेचारशे कोटी
बांधकाम कामगारांच्या घरांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच कामगारांच्या मुलांना मध्यान्ह भोजन, आरोग्य आणि प्रशिक्षण देण्याच्या योजना आखण्यात आल्या आहेत. बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आल्या आहेत, कामगारांच्या हितासाठी राज्यात साडेचारशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.






























































