देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा; हुश्श! ते पुन्हा येणार नाहीत!!

1958

अखेर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आज सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिला आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेने जणू हुश्श! आता ते पुन्हा येणार नाहीत, असाच सुस्कारा टाकला. फडणवीस आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार असले तरी जाता जाता त्यांनी पुन्हा एकदा ‘मुख्यमंत्री’पदावरून पलटी मारली आणि शिवसेनेवर दुगाण्याही झाडल्या.

विधानसभेची मुदत उद्या 9 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आज राजभवनवर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते तडक सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आणि पत्रकारांच्या सरबत्तीला सामोरे जाताना शिवसेनेवर तोंडसुख घेतले. ‘वर्षा’वरील दिवाळी संध्येनंतर फडणवीस पत्रकारांसमोर आलेच नव्हते, पण आज ते बोलणार, काय बोलणार या उत्सुकतेपोटी प्रसारमाध्यमांनी गर्दी केली होती.

 निवडणूक निकालादिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचा धक्का बसल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, निवडणुकीत महायुतीला मतदान झाले होते. मग असे असताना आमचे सर्व पर्याय खुले आहेत असे वक्तव्य का केले, असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला होता असे फडणवीस म्हणाले.

मोदींवर टीका केली
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला वंदनीय आहेत. भाजपच्या नेत्यांकडून त्यांचा अनादर होण्याची शक्यता नाही. गेली विधानसभा निवडणूक वेगवेगळय़ा लढलो तेव्हाही शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आम्ही वक्तव्य केले नाही असे सांगून फडणवीस यांनी मात्र गेल्या पाच वर्षांत व खासकरून गेल्या दहा दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेनेने खालच्या दर्जाची टीका केल्याचे म्हटले. केंद्रात आणि राज्यात सरकारमध्ये राहायचे आणि त्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात टीका करायची हे आम्हाला मान्य नाही. वृत्तपत्र म्हणून मुखपत्रातूनही टीका झाली. अशा प्रकारची टीका सुरूच राहणार असेल तर असे सरकार कशाला चालवायचे, असा प्रश्न आमच्यासमोर येतो. मात्र तरीही महायुती कायम असून युती अजूनही तुटलेली नाही असे सांगण्यास फडणवीस विसरले नाहीत.

उत्तर देण्याची आमचीही तयारी
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातून होत असलेल्या टीकेच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, पाच वर्षे त्यांच्या सोबत काम केले आहे. त्यांच्यावर मी कोणतीही टीका करणार नाही, पण त्यांच्या आजूबाजूचे लोक वक्तव्य करीत आहेत. त्यांनी मीडिया स्पेस नक्की मिळेल, पण अशा वक्तव्यातून सरकार तयार होत नाही. त्यातून दरी वाढवण्याचे काम होते. आम्हाला उत्तर देता येत नाही, असेही कोणी समजू नये. ज्या भाषेत बोलले जाते त्यापेक्षा अधिक जबरदस्त भाषेत उत्तर देण्याची आमची तयारी आहे, पण आम्हाला शोभत नाही. आम्ही जोडणारे लोक आहोत, तोडणारे लोक नाही असे ते म्हणाले.

माझा फोन घेतला नाही
उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी पाच वर्षे काम केले आहे. त्यांचे व माझे जवळचे संबंध आहेत आणि राहतील. त्यांच्याकडे अनेकदा गेलो आहे, फोनवर बोललो आहे आणि अनेक प्रश्नांवर मार्गही काढला आहे. मात्र आता मी त्यांना फोन केले ते त्यांनी घेतले नाहीत. त्यामुळे सत्तास्थापनेची युतीची चर्चा आम्ही थांबवली नाही तर ती शिवसेनेने थांबवली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

चर्चा काँग्रेस-राष्ट्रवादीशी
शिवसेनेने आमच्याशी चर्चा बंद करून काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा सुरू ठेवली. ज्यांच्या विरोधात मते मागून महायुती निवडून आली त्यांच्याशी रोज न चुकता दिवसातून तीन वेळा चर्चा होत होती, पण आमच्याशी होत नव्हती असे सांगून फडणवीस म्हणाले, भाजपशी चर्चा न करता काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा करायची हे शिवसेनेचे धोरण योग्य नाही. आम्ही संवाद साधण्याचे काम सातत्याने केले, पण ते बंद करण्याचे काम शिवसेनेने केले, असेही फडणवीस म्हणाले.

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा विषय कधीच झाला नव्हता, तसा निर्णयही झाला नव्हता असे सांगून फडणवीस यांनी पुन्हा पलटी मारली. तो विषय माझ्यासमोर झाला नव्हता, किंबहुना त्या विषयावर बोलणी फिसकटून आम्ही चर्चा थांबवली होती. त्यानंतर पुन्हा बोलणी झाली, मात्र माझ्यासमोर कधीही निर्णय झाला नव्हता. तो विषय कदाचित शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात झाला असेल तर त्यांनाच तो माहीत असेल. मात्र मी अमित शहा यांना याबाबत विचारले तेव्हा त्यांनी यासंदर्भात शिवसेनेला कोणताही शब्द दिलेला नाही, असे सांगितल्याचे फडणवीस म्हणाले.

पवारांच्या घरी नेत्यांची वर्दळ
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील सिल्व्हर ओक हे निवासस्थान शुक्रवारी दिवसभर राज्यातील सत्तासमीकरणाचे मुख्य केंद्र बनले होते. शिवसेना-भाजपला बहुमत मिळालेले असतानाही महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार नाही हे स्पष्ट झाल्याने कोकण दौरा पुढे ढकलत पवार तातडीने मुंबईत दाखल झाले.

पवार-संजय राऊत भेट
राज्यातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी खासदार राऊत हे पवार यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका जाहीर केल्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी रात्री पुन्हा पवार यांची भेट घेतली.

 

आपली प्रतिक्रिया द्या