युती होणारच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात होऊ घातलेली विधानसभा निवडणूक शिवसेनेला सोबत घेऊन एकत्रपणे लढण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती होणारच असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2019’ या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी युतीबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली. ही निवडणूक शिवसेना-भाजप एकत्र मिळूनच लढणार असून दोन्ही पक्षांत जागावाटपाचे काम अजूनही सुरू आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील जागावाटपाबाबत जे काही फॉर्म्युले किंवा अहवाल मांडले जात आहेत त्यावर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी सांगितले.
मेट्रो कारशेडचा पर्यावरणावर परिणाम होणार नाही

मेट्रो कारशेडसाठी निश्चित करण्यात आलेली आरेतील प्रस्तावित जागा ही कोणत्याही संरक्षित किंवा प्रतिबंधित क्षेत्रात येत नाही. यासाठी तोडण्यात येणाऱया झाडांमुळे पर्यावरणावर कोणताही परिणाम होणार नाही. याबाबत आवश्यक ती काळजी घेण्यात येत आहे. तोडण्यात आलेल्या झाडांच्या बदल्यात मोठय़ा प्रमाणात झाडे लावण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मित्राने फेकलेले दगड हे फुलासारखे
भाजपसोबत सत्तेत सहभागी असतानाही मित्रपक्ष असणाऱया शिवसेनेकडून सरकारवर टीका केली जाते याकडे कसे पाहता? यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ‘ऐसा है की दोस्त अगर पत्थर भी फेके तो उसे फुल समजना चाहिए!’ आमच्यासाठी मित्रांनी फेकलेले दगड हे फुलासारखे असतात आणि मला फक्त कमळाचे फूल माहीत असल्याचे मिष्कील उत्तर दिले.

महायुतीचा 220 पेक्षा अधिक जागांवर विजय
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप महायुती सज्ज असून या निवडणुकीत महायुती 220 पेक्षा अधिक जागा जिंकून विजयी होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू असून युतीची घोषणा लवकरच होईल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात परिवर्तन
मागील सहा महिन्यांत आर्थिक मंदीचे संकट वाढले आहे, बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी अडचणीत आले आहेत, आत्महत्या वाढल्या आहेत. राज्यात परिवर्तन झाले पाहिजे अशी मानसिकता लोकांची आहे. त्यामुळे 24 ऑक्टोबरला राज्यात निकाल जाहीर होईल तेव्हा परिवर्तन होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

काँग्रेस सज्ज
काँग्रेस विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज असून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे जागावाटप जवळजवळ पूर्ण झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी निवडणुकीसाठी सज्ज आहे. जनतेला भेडसावणाऱया या ज्वलंत प्रश्नांवरच आम्ही निवडणूक लढवणार आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.