
नागपुरात महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना आणि कर्नाटकाच्या दादागिरीविरोधात राज्यात असंतोष उफाळून आलेला असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाच तासांसाठी दिल्लीत आले आणि लगेच माघारी गेलेही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे दौऱयाचे औचित्य काय हेही समजू शकले नाही. लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली इतकेच.
मुख्यमंत्री शिंदे यांनी इंडिया गेटजवळील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर झालेल्या राष्ट्रीय वीर बाल पुरस्काराच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
ओम बिर्लांची अचानक भेट
या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची अचानकपणे त्यांच्या 20 अकबर रोड या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लोकसभेत शिंदे गटाला वैधता मिळावी यासाठीची नेहमीची रड शिंदेनी बिर्लांकडे बोलून दाखविल्याचे समजते. शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्यावर लैंगिक अत्याचारासंदर्भात अत्यंत गंभीर आरोप झाल्यामुळेही ही भेट झाली असावी अशी शक्यता आहे. शेवाळेंवरील आरोप गंभीर असल्याने फुटीर गटाला नवा नेता निवडावा लागण्याचीही चिन्हे आहेत. या अनुषंगानेही या भेटीत चर्चा झाल्याचा अंदाज आहे.
माहिती घेतो, विरोधकांचीही माहिती घ्यावी लागेल
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्रोटक भाष्य केले. महाराष्ट्र् कर्नाटक सीमाप्रश्नाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. पेंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत जे ठरले त्याचे पालन दोन्ही राज्ये करतील, असे सांगत मी सीमाबांधवांसाठी जेलमध्ये गेलो होतो याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. तर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर होत असलेल्या आरोपांसंदर्भात पत्रकारांनी छेडले असता, मी माहिती घेतो. ज्यांनी आरोप केले त्यांचीही, माहिती घ्यावी लागेल, असे त्यांनी नमूद केले.

























































