
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने तृणमूल काँग्रेस आणि भाजपातील राजकीय वाताकरण पुन्हा एकदा तापले आहे. मंगळवारी रात्री आपण शपथविधीला हजर राहणार असल्याचे सांगणार्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यूटर्न घेत शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना शपथविधीला निमंत्रित केल्याने बॅनर्जी यांनी कार्यक्रमास हजार राहणार नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून शपथविधीला न येण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. तुमचे संविधानिक आमंत्रण स्कीकारले होते आणि शपथविधीला उपस्थित राहणार होते, पण गेल्या काही दिवसांमधील रिपोर्टस् पाहिले त्यामध्ये पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला शपथविधी सोहळ्याला निमंत्रित करून वैयक्तिक कारणाने झालेल्या हत्यांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न भाजपने चालविला असल्याची टीका बॅनर्जी यांनी केली आहे.
भाजपने हत्या झालेल्या ज्या 54 कार्यकर्त्यांच्या परिवाराला शपथविधीला बोलवले आहे त्या हत्या राजनैतिक असल्याचे सांगितले जाते. पण बंगालमध्ये अशी कोणतीही राजकीय हत्या झालेली नाही. बंगालमध्ये झालेल्या हत्या वैयक्तिक भांडणामुळे झाल्या आहेत. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. उगाचच त्याला राजकीय रंग दिला जात असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे.
हिंसाचारात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना निमंत्रण
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. यामध्ये मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारोहाचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. उद्या गुरुवारी नवी दिल्लीत होणार्या या सोहळ्याला परदेशी नेत्यांसह अनेक क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा निवडणुकीदरम्यान 50 हून अधिक कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारातही काही कार्यकर्ते मारले गेले. या सर्वांची आठवण ठेवून त्यांच्या कुटुंबीयांना मोदी यांच्या शपथविधी समारोहास निमंत्रित करण्यात आले आहे.
मिदनापूरमधील दिवंगत भाजप कार्यकर्ते मनू हंसदा यांचा मुलगा म्हणाला की, माझ्या कडिलांची तृणमूलच्या गुंडांनी हत्या केली होती. आम्हाला आता शपथविधी समारंभास निमंत्रण देण्यात आले असून आम्ही दिल्लीला जातोय त्याचा आनंद असल्याचे सांगितले. मिदानपूर लोकसभा मतदारसंघातून बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष विजयी झाले आहेत.




























































