
सामना ऑनलाईन, मुंबई
‘वन नेशन, वन इलेक्शन’ अशी मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली आहे. देशात एकाच वेळी निवडणुका खुशाल घ्या; पण पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना भाजपच्या प्रचारापासून रोखा, असे खणखणीत प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले. हिंदुस्थानातील एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’च्या 58व्या वर्धापनदिनी ते बोलत होते.
प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या एकजुटीसाठी आपल्या कुंचल्याने ‘मार्मिक’मधून व्यंगचित्रांद्वारे भल्याभल्यांना फटकारे दिले होते. त्या आठवणी उद्धव ठाकरे यांनी यावेळी जागृत केल्या. ‘मार्मिक’मधील शिवसेनाप्रमुखांच्या त्या रेषांनी महाराष्ट्र आणि हिंदुस्थानही घडवला, असे ते म्हणाले. गेली 58 वर्षे ‘मार्मिक’चा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे हा इतिहासच आहे, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.
भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या मागणीचा उद्धव ठाकरे यांनी यावेळी समाचार घेतला. ‘रेशन नसले तरी चालेल, पण यांना इलेक्शन पाहिजे’ अशी खिल्ली त्यांनी उडवली. ते म्हणाले की, इलेक्शन जिंका पण जिंकलेल्या त्या भागात काय काम करताय, किती प्रश्न निर्माण झाले आहेत त्याचीही उत्तरे द्या. महाराष्ट्रही जिंकलात, पण इथे काय चाललेय त्याकडे लक्ष आहे का, असा सवाल त्यांनी केला.
चल रे भोपळय़ा टुणुक टुणुक…
लाखोंना रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात सरकारला आलेल्या अपयशाचाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उल्लेख केला. एकीकडे लाखो रोजगारांची निर्मिती केल्याचा दावा पंतप्रधान करतात आणि दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात की, नोकऱयाच नाहीत. भाजपवाल्यांची आश्वासने म्हणजे भ्रमाचा भोपळाच आहे. निवडणूक आली की भोपळय़ात बसून आश्वासने द्यायची आणि नागरिकांनी त्यासंदर्भात प्रश्न विचारले की ‘चल रे भोपळय़ा टुणुक टुणुक’ म्हणत पळ काढायचा असे सर्व चालले आहे. हा केवळ चुनावी जुमला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आयआयटी मुंबईला एक हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन देणारे कल्याण-डोंबिवलीसाठीही साडेसहा हजार कोटी देणार होते, ते अद्याप दिलेले नाहीत याचीही आठवण त्यांनी करून दिली.
भाजपच्याच नको, सर्वांच्या प्रचाराला जा!
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि भाजपच्या सर्व मंत्र्यांना निवडणुकीच्या प्रचारापासून दूर ठेवा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांना यावेळी दिले. मंत्रीपद स्वीकारताना ‘सर्वांशी समानतेने वागेन’ अशी शपथ घेतली जाते. देशात खरोखरच लोकशाही असेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्री हे भाजपच्याच प्रचारासाठी का जातात? त्यांनी सर्वच पक्षांचा, अगदी अपक्षांचाही प्रचार केला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांनी माझा ललाटलेख लिहिला – पंढरीनाथ सावंत
‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सटवीने लिहिलेले ब्रह्मवाक्य कुणीही बदलू शकत नाही असे म्हणतात; पण माझा ललाटलेख बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिला अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ‘मार्मिक’मध्ये मी चित्रकार व्हायला आलो होतो; पण बाळासाहेबांमुळे चित्रकारातला ‘चि’ उडून गेला आणि तिथे ‘प’ लागल्याने मी पत्रकार झालो असे ते म्हणाले.
याप्रसंगी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार चंद्रकांत खैरे, दैनिक ‘सामना’चे मुख्य वितरक बाजीराव दांगट आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुबोध भावे यांनी केले.
प्रश्न निर्माण केलात, आता उत्तरेही द्या!
महाराष्ट्रात मराठा, धनगर आणि इतर समाज आरक्षणासाठी म्हणजेच आपल्या न्याय्यहक्कांसाठी रस्त्यावर उतरला आहे; पण सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. जातींच्या आरक्षणाला हात लावणार नाही असे केंद्र सरकार सांगत असले तरी मराठी, धनगर समाजानेही तशी मागणी केलेली नाही हे स्पष्ट करतानाच उद्धव ठाकरे यांनी, सरकारच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या या प्रश्नांवर उत्तर काय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.



























































