गोरेवाडामध्ये ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या माध्यमातून जागतिक पर्यटकांपुढे स्थानिक संस्कृती मांडायची आहे. गोंडसमूहाची संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला जगापुढे प्रभावीपणे मांडण्यासाठी या उद्यानामध्ये ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

महाराष्ट्र वन विकास महामंडळातर्फे तयार करण्यात आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला गृह मंत्री अनिल देशमुख, पालक मंत्री तसेच ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर दयाशंकर तिवारी व अन्य उपस्थित होते.

विदर्भाच्या विकासासाठी कटिबद्ध

विदर्भाच्या विकासाबद्दल सरकार कटिबद्ध आहे. विदर्भात महिनाभरात चार दौरे झाले आहेत. वन, जंगल या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत. देशात आतापर्यंत नसेल अशा प्रकारचे सिंगापूरमधील प्राणिसंग्रहालयाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय उद्यान येथे तयार होईल. गोंडसमूह संस्कृती, इतिहास, नृत्य, रहिवास, कला या उद्यानात समर्पकपणे मांडण्यात येईल. नागपूरमध्ये लवकरच सिंगापूरसारखी ‘नाईट सफारी’ सुरू होईल. त्यासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण

बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान प्रकल्पाच्या निर्मितीसाठी 450 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. शासनाने शंभर कोटी रुपये उपलब्ध करून दिल्यामुळे पहिल्या टप्प्यातील इंडियन सफारीचे उद्घाटन होत आहे. उर्वरित निधी तातडीने मिळाल्यास हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, असे वन मंत्री संजय राठोड म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या