
राज्यात कायदा व सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी आपली आहे. त्यामुळे सर्वांनी शांतता पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दादर-माहीम परिसरातील तसेच राज्यातील शिवसैनिकांना केले.
शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या राजनंदा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोरोना लढय़ासाठी मुख्यमंत्री निधीत एक लाख रुपये जमा करण्यात आले. आमदार सदा सरवणकर, ट्रस्टच्या अध्यक्ष प्रिया गुरव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन हा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिवसेना भवनाच्या परिसरात झालेल्या प्रकरणाची माहिती घेतली. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यावर शिवसेना भवनावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही शांत कसे बसणार, अशी भूमिका मांडल्याचे आमदार सदा सरवणकर यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी महिला विभाग संघटक नगरसेविका श्रद्धा जाधव यांच्यासह शिवसेनेच्या आरती किनरे, दीपाली साने, वैशाली पाटणकर, रेखा देवकर, शर्मिला नाईक, अरुंधती चारी, राकेश देशमुख, शशी पडते, राजू पाटणकर, प्रकाश आचरेकर, राजेंद्र सूर्यवंशी, अजित कदम, यशवंत विचले, प्रकाश पाटणकर आदी उपस्थित होते.
शिवसैनिकाने वाघनख परत केले
दरम्यान, शिवसेना भवनाच्या परिसरात झालेल्या राडय़ाच्या वेळेस सोन्याची चेन गहाळ झाल्याची तक्रार भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये केली आहे. पण धारावीतील शिवसेना शाखाप्रमुख संजय काळे यांनी एका पोलीस अधिकाऱयाकडे प्रामाणिकपणे वाघनख परत केले. मग आमच्या विरोधात तक्रार का दाखल झाली, असा सवाल आमदार सदा सरवणकर यांनी केला. तसेच या राडय़ाच्या वेळेस मंगळसूत्र व कानातले चोरीला गेल्याची तक्रार महिला शिवसैनिकांनी भाजपच्या विरोधात नोंदवली आहे, अशी माहितीही आमदार सरवणकर यांनी दिली.

























































