
‘‘बारामतीच्या माझ्या दौऱयात फटाके फुटतील, असे बोलले जात आहे. दिवाळी सुरू झालेलीच आहे. बॉम्ब फोडा, आवाज येऊ द्या; पण नुसता धूर काढू नका. कारण कोरोना अजून गेलेला नाही,’’ असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला लगावला. सध्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या कारवाया आणि विरोधी पक्षनेत्यांकडून होणारी वक्तव्ये यांचाही त्यांनी कडक शब्दांत समाचार घेतला.
ऑग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित बारामतीतील कृषी महाविद्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या ‘अटल इन्क्युबेशन व इनोव्हेशन आणि विज्ञान संशोधन केंद्रा’च्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘‘बारामतीतील या सेंटरचे उद्घाटन माझ्या हस्ते होणे हा भाग्याचा क्षण आहे. देशातील या मोठय़ा सेंटरच्या पाटीवर माझे नाव लागल्याचा मला आनंद आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत उभी केलेली कामे पाहिली, तर पवार कुटुंबीय तळमळीने काम करीत असल्याचे दिसून येते. उद्घाटन झालेल्या येथील इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून तरुण-तरुणींच्या पंखांना बळ देण्याचे, गरुडाप्रमाणे भरारी घेण्याचे काम होईल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकासाचा सूर्य दाखविणारा तरणाबांड नेता
शरद पवार यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचा उल्लेख खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात केला. त्याचा धागा पकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘शरद पवार यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा होत आहे, हे खरे वाटत नाही. पवारांसारख्या तरणाबांड नेत्याने राज्याला विकासाचा सूर्य दाखविला आहे. पवार कुटुंबीयांना विकासाचा ध्यास असून, त्यांच्या तळमळीतून येथे विकासाची कामे उभी राहिली. 50 वर्षांपूर्वीची बारामती आणि आत्ताची बारामती यात मोठा बदल जाणवतो आहे. दगडाला पाझर फोडून दाखविण्याचे काम येथील नेतृत्वाने केले आहे. परदेशात अनेकजण जातात; परंतु तेथील चांगल्या बाबी आपल्याकडे आणतात का? बारामतीत पवार कुटुंबीयांनी परदेशातील जे जे चांगले, ते येथे आणल्याचे दिसते.’’
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बारामतीमधील संस्थांच्या विकासकामांची माहिती दिली तर खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘शरद पवार फेलोशिप’ची घोषणा केली. उद्योगपती बाबा कल्याणी, अतुल किर्लोस्कर यांची भाषणे झाली. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी सौ. रश्मी उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, ‘शिर्के उद्योगसमूहा’चे विजय शिर्के, ‘फिनोलेक्स केबल’चे कार्यकारी अध्यक्ष दीपक छाब्रिया, सुधीर मेहता, विठ्ठलशेठ मणियार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात उपस्थित होते.
…तर मी पवारसाहेबांकडे जाऊन काम करून घेईन!
ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी भाषणामध्ये शासनाकडून अनेक अपेक्षा व्यत्त करताना, मागील सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या भाषणाचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘आज आमच्या मोठय़ा बंधूंची गाडी लय जोरात सुटली. इकडून-तिकडून चिमटा काढत आहेत. मोठे बंधू असल्याने काही बोलता येत नाही. पवारसाहेब, सुप्रिया आणि मी येथे आहे. पण एकच सांगतो, तुमच्या भाषणाची नोंद घेतली.’’ याचा संदर्भ घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘तुम्ही दोघे भाऊ काय आहे ते ठरवा अन् मला सांगा. अजित पवारांनी काही आडकाठी आणली तर माझ्याकडे या; मी पवारसाहेबांकडे जाऊन काम करून घेईन,’’ अशी पुस्ती जोडताच सभागृहात टाळय़ांचा कडकडाट झाला.
आम्ही 25-30 वर्षे उबवणी केंद्र उघडले होते; नको ती अंडी उबवली!
शिवसेनाप्रमुख हे शरद पवारांचे प्रमुख टीकाकार होते. परंतु त्यांची मैत्रीदेखील होती. आम्हीसुद्धा इतकी वर्षे टीका करीत आलो, तरीदेखील शिवसेनाप्रमुख मला नेहमी बारामतीला जाऊन शरदबाबूंनी केलेले काम पाहा, असा सल्ला द्यायचे. मी येथे आज इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन केले. इन्क्युबेशन सेंटरला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. राजकारणात अशी ‘इन्क्युबेशन सेंटर’ उभारावी लागतात. आम्हीही पंचवीस-तीस वर्षे असे केंद्र उभारून तेथे नको ती अंडी उबवली; परंतु त्यातून पुढे काय घडले, हे तुम्ही पाहत आहात,’’ असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगाविला.
आता शेतीपूरक उद्योगांचा विचार करावा लागेल – शरद पवार
शरद पवार आपल्या भाषणात म्हणाले, ‘‘आपण 50 वर्षांपूर्वी सहकाऱयांना बरोबर घेऊन बारामतीत कृषिविकास प्रतिष्ठान व विद्या प्रतिष्ठान या दोन संस्था उभ्या केल्या. एक संस्था शेतीसाठी, तर दुसरी शिक्षणाचे काम करते. शून्यातून सुरुवात केलेल्या या संस्था आता उच्च पातळीवर पोहोचल्या आहेत. शेती संशोधनात नावलौकिक निर्माण झाला आहे. बारामतीतील हे सेंटर संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱयांना प्रोत्साहित करणे, मदत करण्यापासून ते त्यांना उद्योगपती बनविण्यापर्यंतचे काम करीत आहे. उद्योगपती बाबा कल्याणी यांनी शेतीत संशोधन वाढावे, मनुष्यबळाला काम उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कल्याणी यांच्या मताशी मी सहमत आहे. परंतु दुसरी बाजू विचारात घेतली पाहिजे. देशातील 81 टक्के शेतकऱयांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. त्यांतील 60 टक्के क्षेत्राला खात्रीशीर पाणी नाही. त्यामुळे शेतीवर घर चालणार नाही. परिणामी, शेतीवरील भार कमी करावा लागेल. शेतीपूरक उद्योग, प्रक्रिया उद्योगांच्या पर्यायांचा विचार करावा लागेल,’’ असे पवार यांनी सांगितले. ‘‘नावीन्यपूर्ण कल्पना राबविण्यात, शेतकऱयांना प्रोत्साहन देण्यात ज्यांनी उभे आयुष्य घालविले, त्या पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार यांच्याशिवाय या सेंटरला दुसरे नाव असूच शकत नाही,’’ असे शरद पवार म्हणाले.
आपण सगळे मिळून धडा शिकविण्याचे काम करू!
अजित पवारांच्या एका विधानाचा संदर्भ घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मला येताना अजित पवार म्हणाले की, ‘पुण्यानंतर बारामती आता दुसऱया क्रमांकाचे केंद्र बनेल.’ तेवढय़ात अजित पवारांनी ‘शिक्षणाचं’ अशी मिश्कील सुधारणा त्यामध्ये सुचविली. यावरून सभागृहात हशा पिकताच मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘हो, शिक्षणाचं… राजकारणाचंही आहेच. बऱयाच वेगवेगळ्या गोष्टी येथे शिकविल्या जातात. आपण सगळे मिळून धडा शिकविण्याचे काम करू,’’ असे सांगताच सभागृहात हशा उसळला.
































































