ज्याला दाखवायचे आहे त्याला, त्याच वेळी मी करून दाखवतो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्याला दाखवायचे आहे त्याला त्याच वेळी मी करून दाखवतो, असा सणसणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीकाकारांना दिला आहे. माझ्यावर होणाऱया वैयक्तिक टीकेकडे लक्ष देऊ नका, त्यांना उत्तर द्यायला मी समर्थ आहे. तुम्ही महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा, असे आदेशही त्यांनी मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱयांना दिले.

युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी रात्री मुंबईतील शिवसेना विभागप्रमुख, शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीला पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर वैयक्तिक टीका होत असून या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचे त्याला मी त्याच वेळी करून दाखवतो. मी माझ्या कामानेच पोचपावती देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आपल्या विभागात झालेल्या विविध विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवा. निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेशही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱयांना दिले. जनतेच्या सूचना ऐका, त्याप्रमाणे कार्यवाही करा, असेही ते म्हणाले.

कोरोनाची लाट आल्यातच जमा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसैनिकांनी मुंबईकरांच्या सेवेसाठी धावून जायला हवे. त्याकरिता घराघरात संपर्क साधा. लोकांच्या अडीअडचणी ऐका आणि त्यांना सर्वतोपरी मदत करा, असेही उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱयांना सांगितले.

आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

आदित्य ठाकरे यांनी या वेळी मुंबईतील विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तसेच नगरसेवकांच्या विकासनिधीतून झालेल्या कामांची त्यांनी माहिती घेतली आणि कोणती कामे शिल्लक आहेत याची माहिती दोन दिवसांत द्यावी, अशा सूचनाही पदाधिकाऱयांना दिल्या.