
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी वाढदिवसानिमित्त राज्यातील जनतेला अनोखे ‘बर्थ डे गिफ्ट’दिले. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या वाट्याचा जीएसटी परतावा मिळावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारकडे जोरदार पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला यश आले आहे. केंद्राने रोमवारी राज्याच्या वाट्याचा 19 हजार 233 कोटींचा परतावा मंजूर केल्याचे अधिकृतरित्या जाहीर केल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्थेचे गाडे रूळावरून घसरले आहे. महाराष्ट्रालाही मोठ्या आर्थिक ओढाताणीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच महाराष्ट्राच्या न्याय वाट्याचा जीएसटी परतावाही केंद्राकडून गेल्या अनेक महिन्यांपासून दिला जात नव्हता. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या वाट्याचा जीएसटी परतावा मिळावा, यासाठी जोरदार पाठपुरावा केला होता. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पत्रही पाठवले होते. त्याचबरोबर शिवसेनेने राज्याच्या वाट्याचा जीएसटी परतावा मिळावा यासाठी संसदेत आवाजही उठवला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसालाच सोमवारी जीएसटी परताव्याची अनोखी भेट राज्याला मिळाली आहे.



























































