हिंदुस्तान बलशाली करायचा असेल तर शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकरी हा महाविकास आघाडी सरकारचा केंद्रबिंदू असून कर्जमुक्ती हा प्रथमोपचार आहे. शेतकऱ्याला कर्जाच्या विळख्यातून कायमचे कसे बाहेर काढायचे, यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जळगाव येथे केले. हिंदुस्थानला बलशाली करण्याचे स्वप्न पाहायचे असेल तर शेती व शेतकऱ्यांचा सन्मान करायला शिकले पाहीजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करताच सोहळ्यात टाळ्यांचा कडकडाट झाला. जळगाव येथील जैन एरिगेशन आणि कांताबाई भंवरलाल जैन मल्टिपर्पल फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी उच्चतंत्र पुरस्काराचे वितरण जैन हिल्स येथे शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी केंद्रीय कृषीमंत्री, जेष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय भानुदासराव चव्हाण यांना 2018 या वर्षाचा पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी उच्चतंत्र पुरस्कार व सन्मानचिन्ह प्रदान करुन सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी जैवतंत्रज्ञान विकास संशोधन केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

व्यासपीठावर प्रतिभाताई पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषीमंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराती, खासदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार लताताई सोनवणे, शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, महापौर भारती सोनवणे, जैन एरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी खासदार ईश्वरलाल जैन, डॉ. उल्हास पाटील, कवीवर्य ना. धो. महानोर, शिरीष चौधरी, अनिल पाटील, जैन एरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, अतुल जैन, अजय जैन यांची उपस्थिती होती.

जैन हिल्सवरील प्रयोग जादूसारखे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, मागच्या महिन्यात पवार साहेबांनी बोलावल्यामुळे बारामतीला जाऊन आलो. आज येथे जळगावात आलो आहे. दोन्ही ठिकाणी शेतीतील बदल व नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळाले आहे. येथे जैन हिल्सवर शेती तंत्रज्ञानाचे प्रयोग दाखविण्यात आले. ते नुसते प्रयोग नाहीत तर जादुचे प्रयोग आहेत. पद्मश्री अप्पासाहेब पवार व पद्मश्री भंवरलाल जैन यांनी एकत्र येऊन ठिबक सिंचनाचे महत्व पटवून दिले. छत्रपती शिवरायांना आपण निश्चयाचा महामेरु म्हणून जाणतो. हा आदर्श पुढे घेऊन भंवरलाल जैन यांनी विश्व तयार केले आहे. विचाराला कृतीची सांगड घालून शेतीच्या तंत्रज्ञानाचे विविध प्रयोग या ठिकाणी होत आहेत. लहान मुलाला रोग होऊ नये यासाठी ओरल डोस व पोलिओ लस टोचली जाते. त्याचप्रमाणे जैन एरिगेशनच्या माध्यमातून रोप तयार करण्याचे काम केले जाते.

शेती तंत्रज्ञानासाठी आवश्यक ती मदत करु
शेतकरी शेतीमध्ये राब राब राबतो, रात्री वीज गेली तरीही संकटाची तमा न करता शेतात काम करतो. मातीत सोन पिकवणाऱ्या शेतकऱ्यासाठी हे सरकार काम करणार आहे. शेतीत उत्पादन येण्याची वेळ आली की, कुठले तरी संकट उभे टाकते. मात्र, शेतकऱ्यांच्या हातचे पीक जाऊ नये, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत रोप तयार करण्याचे काम येथे होत आहे, असे त्यांनी सांगितले. शेती तंत्रज्ञानासाठी आवश्यक असेल ती मदत व सरकार म्हणून पाठींबा दिला जाईल, असे वचनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

पुरस्कार विजेता शेतकरी व्यासपीठाचा केंद्रबिंदू
पुरस्कार विजेते शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांना पत्नीसह व्यासपीठावर शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आसनावर बसविण्यात आले होते. हा धागा पकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीला उद्या पेपरमध्ये फोटो येणार. वर – खाली काय लिहीले जाईल मला माहित नाही. महाविकास आघाडीत पुन्हा अंतर पडलय, असे लिहीले जाण्याची भिती आहे. मात्र, मला अभिमान आहे. पुरस्कार विजेता शेतकरी व्यासपीठाच्या मध्यभागी बसविण्याची परंपरा या कार्यक्रमात आहे. शेतकरी हा या कार्यक्रमाचाच नाही तर महाराष्ट्र सरकारचाही केंद्रबिंदू असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

काळ्या आईशी इमान राखणाऱ्याचे श्रेय
यावेळी मार्गदर्शन करतांना माजी केंद्रीय कृषीमंत्री जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, देशाच्या कृषी क्षेत्रात शेतमालाला भाव, शेतमालाची विक्री, पाणी असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, या समस्यांच्या तक्रारी न करता शेतकरी राबतो. देशात प्रचंड लोकसंख्या असूनही भूकेची समस्या निर्माण झाली नाही, याचे श्रेय थोडेसे वैज्ञानिकांचे असले तरीही काळ्या आईशी ईमान राखणाऱ्या शेतकऱ्यांचे आहे. पद्मश्री भंवरलाल जैन व पद्मश्री आप्पासाहेब पवार यांनी शेती व शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख पवार यांनी केला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाण्याचा थेंब न् थेंब संचय करण्याची भूमिका घेऊन प्रयत्न केले पाहीजेत, यासाठी केंद्र व राज्य सरकारनेही लक्ष दिले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. या माध्यमातुन शेती व गावाचे चित्र बदलून देशाचे स्वरुप बदलेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या कामासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निश्चितच प्रयत्न करतील, अशी खात्री असल्याचे सांगून सर्वांची साथ मिळेल, असा विश्वास असल्याचे शरद पवार यांनी भाषणाच्या शेवटी सांगितले.

कृषी संशोधन केंद्राचे विस्तारीकरण करा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या भाषणात जळगाव येथील कृषी संशोधन केंद्राचे विस्तारीकरण व बळकटीकरण करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना महावितरणव्दारे तातडीने पेड कनेक्शन देण्याची मागणी केली. प्रगतशील शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फक्त पाणी द्या, एवढीच मागणी असल्याचे सांगून पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

विविध प्रयोगांची पाहणी
प्रारंभी दिपक चांदोरकर यांनी गणेश वंदना म्हटली. या कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यासह खान्देशातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जैन हिल्सच्या हेलीपॅडवर जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, जि.प. सीईओ बी.एस. पाटील यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील, महापौर, जि.प. अध्यक्षांनी स्वागत केले. जैन हिल्सच्या परिसरातील शेती तंत्रज्ञानासंबंधी विविध प्रयोगांची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.