महाराष्ट्राचे पर्यटन वैभव जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचविणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

759

महाराष्ट्रामध्ये फार मोठे पर्यटन वैभव आहे. महाराष्ट्राचा हा ठेवा जगासमोर आला पाहिजे. पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यासाठी व्यापक प्रयत्न करत असून राज्यातील पर्यटनाची देशविदेशात प्रसिद्धी करून जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे सांगितले.

भंडारा, गोंदिया जिह्यातील नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गाची चित्रे मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्प्रेसवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. हिरवी झेंडी दाखवून त्यांनी या सुशोभित एक्प्रेसला रवाना केले. विविध रेल्वे-एक्प्रेसवर महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची अशीच जाहीरात करून देशभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करू, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास राज्याचे पर्यटनमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार आदित्य ठाकरे, दीपक केसरकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, पर्यटन संचालक दिलीप गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

एक्प्रेसवर नागझिरा अभयारण्यातील पक्षी आणि निसर्गचित्रांसह एमटीडीसीच्या बोधलकसा पर्यटक निवासाची चित्रेही झळकली आहेत. एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्या संकल्पनेतून आणि राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम साकारला आहे.

क्रुझ पर्यटन ते ऍडव्हेंचर टुरिझम
राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल यावेळी म्हणाल्या की, महाराष्ट्रात समुद्रकिनारे, गडकिल्ले, प्राचीन गुंफा, व्याघ्र प्रकल्प, जंगले, थंड हवेची ठिकाणे, बॉलीवूड अशा विविध प्रकारातील पर्यटन स्थळे आहेत. अशा प्रकारचे पर्यटन वैविध्य असलेले महाराष्ट्र हे देशातील प्रमुख राज्य आहे. याबरोबरच क्रुझ पर्यटन, ऍडव्हेंचर टुरीझम, मेडिकल टुरीझम, एक्सपिरिएन्शल टुरीझम, कृषी तथा ग्रामपर्यटन आदींनाही राज्यात चालना देण्यात येत आहे. राज्यातील पर्यटन वैभवाची व्यापक प्रसिद्धी करून जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या