हम ‘मिलकर’ होंगे कामयाब! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वास

cm

‘मला तुम्ही विचाराल की देव कुठे आहे, तर मी म्हणेन देव मदत करणाऱया सर्व हातांत आहे, सर्व मिळून जेव्हा काम करतात तेव्हा यश हे मिळतेच. कोरोनाविरोधाच्य या लढय़ात सर्वांच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. हम ‘मिलकर’ होंगे कामयाब, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. भुकेलेल्यांना अन्न पोहोचविण्यासाठी मुंबई महापालिका, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस यांनी सुरू केलेल्या https://milkar.ketto.org/covid19 या क्राऊडफंडिग संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

milkar-foundation

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मार्च महिन्यापासून राज्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाला त्या दिवसापासून आतापर्यंत राज्य शासनाने अनेक उपाययोजना केल्या. फक्त राज्य शासनाने हे काम केले का? तर नाही. हे काम कुण्या एकटय़ाचे नाही. शासनासोबत अनेकांचे मदतीचे हात पुढे आले, त्या सर्व मदतीच्या हातांचा मला अभिमान वाटतो. कोरोनाविरुद्ध लढतांना खूप लोक, स्वंयसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस सहभागी होऊन काम करत आहेत. ‘मिलकर’ हे त्यातीलच एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात काही अडचणी येऊ शकतात, अशा परिस्थितीत शासनाला तुम्हा सर्वांच्या मदतीची गरज आहे. मदत करणाऱया सर्व लोकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह आर.पी.जी. फाऊंडेशनच्या राधा गोयंका, अक्षय गुप्ता, केटूचे कुणाल कपूर, अनंत गोयंका यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आदींचा समावेश होता.

मुंबईत कोणीही भुकेलेले राहणार नाही – आदित्य ठाकरे
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मिलकर व्यासपीठाच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत रेशनकिट पोहोचवणे शक्य होणार असून यामुळे मुंबईत कुणीही भुकेले राहणार नाही असा विश्वास क्यक्त केला. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगतांना त्यांनी मिलकरच्या टीमचे अभिनंदन करून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

– गोदरेज ऍण्ड बॉयसी, आरपीजी फाऊंडेशन, एटीई चंद्रा फाऊंडेशन हे या निधीत भरीव भर घालणार आहेत. एखाद्याने योगदान दिल्यास, त्याच्यामध्ये पाच पट भर घालून हा निधी संबंधित वॉर्डमधील लोकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या