
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी मान्सूनपूर्व कामांवर त्याचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्या. नालेसफाईसह साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, नियोजनानुसार सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महापालिका प्रशासनाला दिले.
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन बैठकीत घेतला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईतील नालेसफाई करतानाच आवश्यक त्या ठिकाणी नाले खोलीकरण अथवा रुंदीकरण करून त्यांची नैसर्गिक प्रवाह क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल. तसेच महामार्ग आणि पदपथाच्या बाजूला टाकण्यात आलेले डेब्रिज उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी डेब्रिज टाकणाऱयांना सूचना द्यावी. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मलेरिया, डेंग्यूची शक्यता वाढते. त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. ही सर्व मान्सूनपूर्व तयारीची कामे नियोजनानुसार 31 मेपूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सुरू असलेल्या कोस्टल रोड, मेट्रो अशा कामांच्या परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने यंत्रणांशी समन्वय साधावा, अशी सूचना केली.
पाणी साठण्याची 406 ठिकाणे शोधून काम सुरू – चहल
मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल म्हणाले की, मुंबईमध्ये 2020 मध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल 64 टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार पावसाळापूर्व नालेसफाई व गाळ काढण्याच्या कामांची सुरुवात ऑक्टोबर 2020 मध्येच करण्यात आली. परिणामी प्रशासकीय कार्यवाही व निविदा आदी प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामे लवकर सुरू झाली. मुंबईत पावसाचे पाणी साठण्याची संभाव्य अशी 406 ठिकाणे शोधून तेथील आवश्यक कामे सुरू करण्यात आली आहेत. मुंबईतील 30 वर्षांपेक्षा अधिक जुन्या व राहण्यास धोकादायक असलेल्या इमारतींना नोटिसा देणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आदी कामांना प्रारंभ करण्यात आल्याचेही इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले.































































