
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयातील विविध विभागांना भेट देऊन तेथील कर्मचाऱयांशी प्रत्यक्ष संवाद साधला. कर्मचाऱयांची आस्थेवाईकपणे चौकशी करताना एका दिव्यांग कर्मचाऱयाची त्यांच्यासमवेत छायाचित्र घेण्याची इच्छाही पूर्ण केली. मात्र त्याचवेळेस राज्याचा कारभार गतिमान करताना अधिकाधिक पेपरलेस काम आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱयांना केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात आले तेव्हा त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुलं वाहून अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातल्या काही विभागांना भेट दिली. कर्मचाऱयांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी विचारल्या. अशा प्रकारे थेट विभागांना भेट देऊन कर्मचाऱयांशी बोलणारे मुख्यमंत्री विरळच आहेत, अशी प्रतिक्रियाही कर्मचाऱयांनी व्यक्त केली.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱयांना भेटले. त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सजावटीचे त्यांनी कौतुक केले तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेचेही पूजन केले. कर्मचाऱयांशी बोलून त्यांच्या कामाविषयीही त्यांनी माहिती घेतली.
यानंतर मुख्यमंत्री महसूल विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, विधी व न्याय अशा विभागात फिरले. यावेळी त्यांनी कर्मचाऱयांशी संवाद साधला. यावेळी मुख्य सचिवांनी मंत्रालयात 6 एप्रिलपासून फाईल्स आणि कागदपत्रे यांचे संगणकीकरण तसेच स्वच्छता, अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट याची मोहीम सुरू असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनीदेखील पेपरलेस कामांवर भर देताना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करावा अशा सूचनाही केल्या. मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्ष तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील कक्षांनादेखील भेट देऊन पाहणी केली व कामकाजाविषयी सूचना केल्या.
बाबासाहेबांवरील प्रदर्शन कायमस्वरूपी
मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात पुराभिलेख संचालनालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याच्या तयारीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. हे प्रदर्शन कायमस्वरूपी इंदू मिल येथील स्मारकस्थळीही प्रदर्शित करा अशी सूचना केली. मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील बाबासाहेबांचा दस्तावेज तसेच पत्रं, जुनी छायाचित्रे यांची उत्सुकतेने पाहणी केली व सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्यासोबत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशीष कुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस आयुक्त संजय पांडे उपस्थित होते.
सशक्त राज्यघटनेच्या पाठबळावरच विकासाची वाटचाल
मुख्यमंत्र्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ‘भारतरत्न’ डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सशक्त, महान अशा राज्यघटनेच्या पाठबळावरच आपल्या राज्याच्या विकासाची वाटचाल सुरू आहे, अशी कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
विविधतेने नटलेल्या आपल्या देशाला राज्यघटनेच्या एका सूत्रात गुंफून एकसंध ठेवण्याची किमया डॉ. बाबासाहेबांनी केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना त्यांच्या या योगदानासाठी आपल्याला कृतज्ञच राहावे लागेल. डॉ. बाबासाहेबांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आपल्याला राज्य आणि देशाबद्दलची बांधिलकी जाणीवपूर्वक जपावी लागेल. डॉ. आंबेडकर यांच्या समता-बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता या सूत्रांविषयी जागरूक राहावे लागेल. त्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
दिव्यांग कर्मचाऱयाने काढला सेल्फी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात विविध विभागात फिरत असताना सर्व कर्मचारी त्यांच्या बाजूला गोळा होत होते. मुख्यमंत्री प्रत्येक कर्मचाऱयाची आस्थेवाईकपणे चौकशी करीत होते. अनेक कर्मचाऱयांनी मोबाईलवर फोटो काढण्यास सुरुवात केली. तेव्हा एक दिव्यांग कर्मचारी पुढे आला आणि त्याने मुख्यमंत्र्यांसोबत सेल्फी घेण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी सर्वप्रथम दिव्यांग कर्मचाऱयाची अतिशय प्रेमाने विचारपूस केली आणि सोबत फोटो काढण्याची इच्छाही पूर्ण केली तेव्हा तो कर्मचारी भारावून गेला.
मुख्यमंत्र्यांनी साधला थेट संवाद, कसे काय, बरे आहात ना!
मंत्रालयातील कर्मचाऱयांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या आपलेपणामुळे व प्रत्यक्ष कामकाजाविषयी केलेल्या सूचनांमुळे उत्साह दुणावल्याची प्रतिक्रिया गृह विभागातील कर्मचारी अश्विनी धावणे यांनी दिली. याच विभागातील प्रगती मोरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी, ‘कसे काय, बरे आहात ना?’ अशा शब्दांत विचारपूस केली. विधी व न्याय विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी प्रियंका गावडे व त्यांच्या सहकारी म्हणाल्या, आमच्या विभागाला भेट देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री असावेत. त्यांनी अगदी साधेपणाने विचारपूस केली. कामाची चौकशी केली. त्यांच्या भेटीने आमचाही उत्साह वाढला आहे, असे कर्मचाऱयांनी सांगितले. दोन-अडीच वर्षांपूर्वी 8 मार्च या जागतिक महिला दिनी आम्हा सर्वांना आपुलकीने पत्र आणि फूल देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्चर्यचकित केले होते. त्यांची आजची भेटही अशीच आश्चर्यचकित करणारी होती, अशी आठवण महिला कर्मचाऱयांनी जागवली.





























































