
ग्रामीण भागातील सामान्य माणसाला बळ देण्यासाठी नाबार्डने अधिक लक्ष केंद्रीत करावे. राज्यातील जे विभाग अविकसीत आहेत त्यांना अधिकचा निधी देताना संपूर्ण राज्यात समतोल निधी वाटप राहील याकडे लक्ष द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. नाबार्डने तयार केलेल्या 2021-22 राज्य पत पुरवठा आराखडा फोकस पेपरचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.
राज्य सरकारने शेतकऱयांसाठी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ दिला. मात्र बहुतांश राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी शेतकऱयांना नव्याने पीक कर्ज देताना उद्दीष्टपूर्ती केली नाही. यावर्षी सर्वच बँकांनी शेतकऱयांना कर्ज पुरवठा करताना उद्दीष्टपूर्तीसाठी प्रयत्न करावा आणि शेतकऱयांना पीक कर्जाचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी बँकांच्या प्रतिनीधींना केले.
यावेळी कृषीमंत्री दादा भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार अनिल देसाई यांच्यासह नाबार्डचे महाव्यवस्थापक एल.एल. रावल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य बँकर्स समितीचे प्रतिनिधी, रिझर्व्ह बँकेचे विभागीय संचालक अजय मिच्यारी उपस्थित होते.
































































