शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

2693

सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याला उद्यापासून सुरूवात होत असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दिवशीच पहिली यादी जाहीर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. ”महाविकास आघाडीचे सरकार विरोधकांना नाही, तर जनतेला बांधील आहे. आता सरकार स्थिर झाले आहे. काम करत आहे यामुळे विरोधकांना पोटदुखी होत आहे. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची वचनपूर्ती उद्यापासून होत आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होईल. तीन महिन्यात या योजनेची प्रक्रिया पूर्ण होईल. उद्याची यादी शेवटची नाही. टप्प्याटप्प्याने याद्या जाहीर केल्या जातील. सरकारने केलेल्या नियोजनाप्रमाणे सुरूवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस या योजनेचे काम पूर्ण होईल,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

विरोधकांनी केलेल्या प्रत्येक आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून सरकारने जनहिताचे आणि शेतकऱ्यांसाठी अनेक चांगले आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सरकारचे हे यश विरोधकांना बघवत नसल्याने ते आरोप करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारने सर्व घटकातील जनतेला आधार देण्याचे काम केले आहे. सगळ्याच समस्या एका फटक्यात सोडवता येणार नाही. अचाट वाटावे म्हणून एखादे काम सुरू करायचे आणि पेलवले नाही म्हणून उताणे पडायचे हे आमच्या सरकारला जमत नाही. आमचे सरकार नुसत्या घोषणा देत नाही, तर कामही करत आहे,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या