धीर सोडू नका! मराठवाडय़ातील शेतकऱयांना आपत्तीतून बाहेर काढणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडय़ात अतिवृष्टीमुळे शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली. बळीराजावर आभाळ कोसळलेय, पण धीर सोडू नका. सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे. शेतकऱयांना या आपत्तीतून बाहेर काढणार, अशी ग्वाही देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत तत्काळ पोहचवा, असे निर्देश आज प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी सायंकाळी आणि आज सकाळीदेखील मराठवाडय़ातील जिह्यांच्या पालकमंत्र्यांशी या परिस्थितीवर चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाडय़ातील पूरस्थितीबाबत बैठक घेऊन पूरग्रस्तांच्या नुकसानीबाबत आढावा घेतला. कोणत्याही परिस्थितीत बाधित शेतकरी, नागरिक यांना प्रशासनाने तातडीची सर्वतोपरी मदत पोहचवावी असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांच्या बचावकार्यावर लक्ष द्यावे तसेच सर्व यंत्रणांत समन्वय ठेवावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या.

नुकसानीचे पंचनामे सुरू करा

सध्या बचाव व तातडीच्या मदतकार्यास वेग द्यावा व महसूल विभाग, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करावेत, असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी फळबागांचेही नुकसान झाले आहे, शेतपीक वाहून गेले आहेत. ही अभूतपूर्व परिस्थिती आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एनडीआरएफ जवानांनी तसेच स्थानिक पोलीस यंत्रणेने धाराशीव, लातूर, संभाजीनगर, यवतमाळ भागातील सुमारे शंभर जणांना वाचवले याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.