नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलकांचे गुन्हे मागे – मुख्यमंत्र्यांचे आदेश

1460

आरे कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाणार येथील पेट्रोकेमिकल रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच महत्वाचे आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. यालाच रयतेचा राजा म्हणातात, अशा शब्दात रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नाणार येथे केंद्रातील भाजप सरकार रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत होते. विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांसोबत शिवसेनेने तीव्र आंदोलन छेडले होते. नाणार परिसरात सुरु झालेला हा लढा शिवसेनेने मुंबईत विधानभवनातून थेट दिल्ली पर्यंत नेत संसदेतही रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला होता. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणार येथे येऊन स्थानिक ग्रामस्थांना प्रकल्प रद्द करू असा शब्द दिला होता. लोकसभा निवडणूकीपूर्वीच हा प्रकल्प रद्द करत उध्दव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला होता. आता रिफायनरीच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी जनहिताचे निर्णय घेत जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे. आरे येथील कारशेडला विरोध करत जंगल वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मागे घेतले. त्यापाठोपाठ कोकणचे पर्यावरण आणि निसर्ग सौंदर्य राखण्यासाठी नाणार येथील रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाणारवासियांना दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णायाचे नाणारवासियांनी स्वागत केले असून त्यांचे आभार मानले आहेत.

nanar

आपली प्रतिक्रिया द्या