कार आणि सरकार दोन्ही सुरळीत सुरू आहेत! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ठाम प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कार आणि सरकार दोन्ही चालवतो आहे. त्यामुळे कार आणि सरकार दोन्ही चांगले चालले आहेत, असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते.

राज्य सरकारचे स्टिअरिंग कुणाच्या हाती, या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना जोरदार टोले लगावले. माझं बळ हे लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे. स्टेअरिंग कुणाच्या हाती, पुढे कोण बसलं आहे मागे कोण बसलं आहे हे महत्त्वाचं नाही. आमचे सरकार समन्वयाने सुरू आहे. आरोप सगळ्यांवर केले जातात. बोलणारे खूप लोक आहेत. मी कुणाचीही पर्वा करत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहोत. आमच्या नात्याची कुणीही चिंता करू नये. बाळासाहेब ठाकरे भाजपला काय म्हणायचे हे सगळ्यांना ठाऊक आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

पुढील निवडणुकीत ‘ठाकरे-पवार पॅटर्न’ राबवणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणुकांना अजून खूप वेळ आहे आणि सरकार नंतरसुद्धा येणार आहे. किमान समान कार्यक्रमावर सरकार चालले आहे. भिन्न विचारांचे पक्ष आहेत हे आम्हाला तिघांनाही ठाऊक आहे.

न फिरता काम करणं चागलं की, न काम करता फिरणं?

मुख्यमंत्री फिरत नाही असे आरोप होत असल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले असता न फिरता काम करणं चांगलं की, न काम करता फिरणं, असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले, एका ठिकाणी बसून मी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी बोलतो आहे. एकाच वेळा अनेकांशी बोलून प्रश्न तडीस जात असतील तर केवळ दाखविण्यासाठी फिरण्यात काय अर्थ आहे.

डोळ्यावर चष्मा लावा, पण झापडं लावू नका?

फडणवीस यांच्याकडून होत असलेल्या टीकेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, असं आहे की इथे एकमेव नेता ते आहेत. ते म्हणजे तेच. एवढा ज्ञानी माणूस आहेत. डब्लूएचओही त्यांना सल्लागार म्हणून बोलावू शकते. भाजपसोबत आमचा घटस्फोट झाला आहे. तेव्हा आमच्या नात्याची चिंता कशाला करता, असा सवाल त्यांनी केला. आम्ही तीस वर्षं होतो पण त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही. पण ज्यांच्यासोबत 30 वर्षं संघर्ष केला त्यांनी विश्वास दाखवला, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी सरकारमध्ये प्रशासनाचं वर्चस्व आहे या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपण निर्णय घ्यायचे असतात प्रशासन त्याची अंमलबजावणी करते. त्यामुळे चष्मा घालायला हरकत नाही, पण झापडं लावू नका, असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.

सुशातिंसह प्रकारणात कुणालाही सोडणार नाही!

सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकारणावरून तसेच बिहार पोलिसांना मुंबईत तपास करू न देण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली. मुंबई पोलीस सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करीत आहेत. देशात यापेक्षा सक्षम पोलीस दल कोणते आहे ते दाखवून द्या. मुंबई पोलीस हे कोरोना योद्धा आहेत त्यांचा अपमान मी होऊ देणार नाही. या प्रकरणात पुरावे आणा कोणालही सोडणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

विरोधी पक्षाला पोटदुखी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. कोरोना संकटात त्यांनी चांगली मदत केली. कदाचित हीदेखील एक पोटदुखी असेल राज्यातील विरोधी पक्षाला, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हाणला. सरकार पाडायच्या गोष्टी करता, आधी चालवून तर दाखवा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, चालवून तर दाखवा म्हणजे आता आम्ही रांगतोय का? सरकार मी एकटाच चालवत नाही, सर्व सहकारी सक्षम आहेत.