
कमी जागेत जास्त पीक घेतलं जातं, त्याप्रमाणे कमीत कमी आमदारांमध्ये सरकार स्थापन करण्याचा चमत्कार शरद पवार यांनी करून दाखवला. त्यामुळे ‘जागा जास्त आहे, आमचंच पीक येणार असं कोणी आता म्हणू शकत नाही. आम्ही कमी जागांमध्ये तुमच्यावर मात करू शकतो हे दाखवून दिलं आहे’, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावतानाच राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पवारांनी वापरलेल्या महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याचे त्यांनी कौतुक केले.
वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अजित पवार, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. ‘सहकार क्षेत्र आणि राजकारण वेगळे केले जाऊ शकत नाही. कारण अनेक राजकीय नेत्यांनी सहकार क्षेत्र मजबूत केले आहे. साखर कारखानदारी आणि साखर क्षेत्राने अनेक नेते दिले आहेत,’ असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साखरेमागे एवढे मोठे काम असेल याची कल्पना नव्हती, असे स्पष्टपणे नमूद करत साखरेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तज्ञांची एक समिती स्थापन करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आधीच्या सरकारचे निर्णय बोलाचा कढी आणि बोलाचा भात
आधीच्या सरकारचे निर्णय म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचा भात होता. त्याला फोडणी कोण देणार, असा टोला लगावतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटची शाखा मराठवाडय़ात उघडण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी घोषणा केली. महाराष्ट्राच्या साखर उद्योगात वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे मोठे योगदान आहे, असे त्यांनी सांगितले.
मी राष्ट्रवादीतच! – विजयसिंह मोहिते-पाटील
माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी व्यासपीठावर आले. त्या वेळी व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार हे एका बाजूला बसून सहकाऱयांशी चर्चा करत होते. मोहिते-पाटील यांना पाहताच त्यांनी हाताने खुर्ची घेण्यास सांगितले. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे त्यांची चर्चा रंगली. साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, रोहित पवार हेसुद्धा चर्चेत सहभागी होते. उपस्थितांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे मोहिते-पाटील यांनी राज्यातील सत्तांतरानंतर एकाच व्यासपीठावर शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या. मोहिते-पाटील यांना चर्चेबद्दल पत्रकारांनी छेडले असता मी राष्ट्रवादीतच आहे. यापूर्वीही शरद पवार यांची दोन वेळा भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.
…तर शरद पवार जबाबदार
मुख्यमंत्री झाल्यानंतर महिनाभराच्या आतच मी वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटच्या कार्यक्रमाला आलो. साखर या विषयावर मी एखादा शब्द चुकीचा बोललो, किंबहुना तुम्हाला जे काय माझ्याकडून अपेक्षित आहे ते बोलण्यात आले नाही तर त्याला जबाबदार कोण? हे आपल्याला अगोदरच सांगून ठेवतो. माझे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मित्र आणि ज्यांनी मला प्रेमाने आधार देत मुख्यमंत्री होण्याचा आदेश दिला ते आदरणीय शरद पवार हेच याला जबाबदार असतील अशी मिष्कील टिप्पणी करताच उपस्थितांनी टाळय़ा वाजवून उद्धव ठाकरे यांना दाद दिली.
हर्षवर्धन पाटीलही लवकरच इकडे येतील!
व्हीएसआयच्या संचालक मंडळावर असल्याने वार्षिक सभेत उपस्थित असलेले माजी सहकारमंत्री आणि भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची व्यासपीठावर शेजारी शेजारी बसून सुरू असलेली हितगुजही सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अजित पवार व्यासपीठावर आले तेव्हा त्यांनी व्यासपीठावरील खुर्ची पुढे ठेवण्यात आलेल्या नेमप्लेट स्वतः बदलल्या. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची पाटी जयंत पाटील यांच्या शेजारी ठेवून स्वतःची आणि हर्षवर्धन पाटील यांची पाटी शेजारी-शेजारी ठेवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आता आपल्याकडे उसाचा गोडवा आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटीलही इकडे येतील अशी पुस्ती जोडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शब्द पाळतील – पवार
मागील वर्षी वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जालना येथे वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटसाठी जागा दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनांची त्यांनी अद्याप पूर्तता केली नाही. जे मुख्यमंत्री आश्वासनांचा शब्द पाळत नाहीत अशांसोबत संघर्ष करण्याचे काम या मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला शब्द पाळतील. आपले सरकार आता जालना येथे निश्चितपणे ऊस संस्था उभारेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विचार
सर्वांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणाऱया शेतकऱ्यांबाबत सरकार किचार करत असून त्याची माहिती बँकांकडून मागकून घेतली आहे. त्याबाबत सरकार सकारात्मक असून नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही सरकार योजना आणणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.



























































