प्रबोधनकारांनी ढोंगावर लाथा मारायला शिकवले! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य शंभर वर्षांपूर्वीचे आहे. त्या काळात वाईट रूढी परंपरा मोडण्यासाठी त्यांनी काय केले ते आताच्या पिढीला कळणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या विचारांतून आमची जडणघड झाली आहे. ढोंग दिसेल तिथे ढोंगावर लाथ मार.. मग काय होईल ते होईल.. अशी शिकवण त्यांनी दिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. प्रबोधनच्या शताब्दीनिमित्त केशव सीताराम ठाकरे यांचे लेख असलेले प्रबोधनमधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथाचे शानदार प्रकाशन आज सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्रीपदावर असताना आपल्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन होत आहे. हा योगायोग आहे. माझ्या दृष्टीने मुख्यमंत्रीपद हा बहुमान आहे. पण प्रबोधनकारांचा नातू हे माझ्ये भाग्य आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगितले.

प्रबोधनकारांच्या जडणघडणीतून

प्रबोधनकारांनी दिलेले संस्कार व जडणघडणीबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जुन्या मातोश्रीमधील हॉलमधील सोफ्यावर प्रबोधनकार मांडी घालून बसायचे आणि आम्हा नातवंडांना गोष्टी सांगायचे. प्रबोधनकारांनी त्यांच्या आयुष्यातील गोष्टी सांगितल्या. त्यातून आमची जडणघडण झाली असे ते म्हणाले.

प्रबोधनकारांचे शब्दांचे धन

या सोहळ्यात शिवसेनाप्रमुखांच्या एका कार्यक्रमाची चित्रफित दाखवली. त्यामध्ये शिवसेनाप्रमुखांनी दसरा मेळाव्याचा उल्लेख केला होता. त्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, काय योगायोग बघा. कालच दसरा मेळावा झाला आहे. प्रबोधनकारांच्या शब्दाचे जे काही धन आहे. ते माझ्याकडेही आहे. पण काही वेळा लोकशाहीत बोलण्याचे धाडस लागते. पण ते बोलायची हिंमत माझ्यामध्ये आहे.

देश हाच धर्म

प्रबोधनकार ठाकरे हे नास्तिक नव्हते त्यांची देवीवर प्रचंड श्रध्दा होती. पण त्यांनी भोंदुगिरीला लाथा घातल्या असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू धर्म व राष्ट्रभिमानाचे उदाहरण दिले. धर्माचा अभिमान घरात ठेवा. पण जेव्हा घराबाहेर पडाला तेव्हा देश हाच आमचा धर्म अशी धारणा ठेवा. धर्माची मस्ती घेऊन कोणी समोर उभा राहिला तर कडवट देशाभिमानी-राष्ट्राभिमानी म्हणून उभे रहा असे मुख्यमंत्री म्हणाले.

माझा ‘पितृ’पक्ष

नवरात्री उत्सवापूर्वी पितृपक्ष होता त्याचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की. पितृपक्षात नवे काम करावे का असा प्रश्न मला विचारला तेव्हा माझा पक्षच ‘पितृ’पक्ष आहे. कारण माझ्या वडिलांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

प्रबोधनकारांच्या साहित्याचे भाषांतर

प्रबोधनकारांच्या साहित्याचे हिंदी व इंग्रजी भाषेत भाषांतर व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या साहित्याचे भाषांतर करून इतर राज्यात गेले पाहिजे अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मनोगत व्यक्त केले. या ग्रंथाचे सर्वत्र स्वागत होईल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष श्रीधर तथा राजा दीक्षित, आमदार मंगलप्रभात लोढा, विश्वंभर चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने संपादक मंडळाचे पत्रकार सचिन परब, ज्ञानेश महाराव, सुनील कर्णिक आदिंचा सत्कार झाला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या balasahebthackeray.in या संकेतस्थळाचे लोकार्पणही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रबोधन नियतकालिकाच्या शताब्दी वर्षानिमित्त प्रबोधन नियतकालिकातील केशव सीताराम ठाकरे यांच्या त्रिखंडात्मक लेखसंग्रह ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झाले.

यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्रीडॉ. विश्वजीत कदम, महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे आदी उपस्थित होते.