
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विखे-पाटील कुटुंबाशी असलेल्या ऋणानुबंधांचा भावनिकतेने उल्लेख करून आठवणींना उजाळा दिला. काँग्रेसने कोंडलेला हिरा शिवसेनेमध्ये घेऊन शिवसेनाप्रमुखांनी तो कोंदणात बसविला, अशा शब्दांत डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. मूर्ती छोटी असली तरी त्यांची कीर्ती मोठी होती. विखे-पाटील घराणे जिद्दीने परिस्थितीवर मात करीत पुढे आले. विखे-पाटील यांनी स्वतःचे आयुष्य नाही, तर जनतेचे आयुष्य बदलले. ते भाषणे आणि पुस्तक लिहीत बसले नाहीत, तर त्यांनी आधी केले आणि नंतर सांगितले, असे गौरवोद्गार काढत पक्षीय मतभेद विसरून मी कार्यक्रमास उपस्थित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘हे आत्मचरित्र मी चाळले. अनेकजण परिस्थितीचे शिकार बनतात; पण या घराण्याने तसे होऊ दिले नाही. त्यांनी परिस्थिती बदलली. सरकारी कामात साचेबद्ध उत्तर मिळते; परंतु असे का, याचे उत्तर बाळासाहेबांनी शोधले. ओढय़ावरचा पूल बांधायचाय. तेही बाळासाहेब बारकाईने पाहत आणि त्यात बदल सुचवत. अधिकारी सांगायचे त्यात खर्च वाढेल; मात्र बदल केला नाही तर त्याचा उपयोग काय, असे म्हणून ते बदल करण्यास भाग पाडत. परिस्थिती बदलली; मात्र जिद्द, राहणीमान तेच राहिले व विचारही शेवटपर्यंत तेच राहिले. हेच बाळासाहेबांचे खरे वैशिष्टय़’ असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘परिस्थितीत बदल हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे. सहकार चळवळ कशी उभारली हे ते वडिलांकडून शिकले. भुताच्या माळावर नंदनवन कसे फुलवले, या सर्व अशक्यप्राय गोष्टी आहेत. शेतकऱयांची जी संस्था असते, ती जपली पाहिजे. ते काचेचे भांडे आहेत. खरा मालक समाज आहे, आपण केवळ विश्वस्त आहोत, हे बाळासाहेब वारंवार सांगत. सभासदांच्या हिताला बाधा येईल, असा कोणताही निर्णय त्यांनी घेतला नाही.’






























































