
आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी राज्य सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केली. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यातील जलविद्युत केंद्राचे सादरीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी यातील अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून माहित करून घेतल्या.
या टप्प्यातून 1920 मेगावॅट वीजनिर्मिती
कोयना जलविद्युत प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्या वेळी सर्व मिळून या टप्प्यातून 1920 मेगावॅट वीज निर्मिती केली जाऊ शकते. हेळवाकजवळील देशमुखवाडी येथे या प्रकल्पाचा चौथा टप्पा तयार करण्यात आला आहे. सह्याद्री पर्वताच्या पोटात 300 मीटर खोलीवर हा टप्पा आहे. यातून लेक टॅपिंग पद्धतीने 1000 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते.
पाटण तालुक्याचा पर्यटन आराखडा तयार करा
पाटण तालुक्यात पर्यटनाला मोठा वाव असून स्थानिकांना रोजगारनिर्मिती होऊ शकते हे लक्षात घेता पाटण तालुक्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करावा. यासंदर्भात अधिवेशनानंतर बैठक घेऊन पाटण येथील पर्यटनाला शासन चालना देईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोयना धरण परिसराला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी कोयना धरणाची माहिती घेतली.
































































