हिंमत असेल तर अंगावर या, ईडी, सीबीआय आणि आयटीच्या आडून काय येता; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘छापा टाकायचा आणि काटा काढायचा ही तुमची थेरं फार दिवस चालणार नाहीत. हिंमत असेल तर अंगावर या, ईडी, सीबीआय आणि आयटीच्या आडून काय येता?’ असा खणखणीत आवाज देत शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ‘सत्तेचे व्यसन’ लागलेल्या भाजपला जबरदस्त तडाखे लगावले. एखाद्याच्या कुटुंबावर हल्ला करायचा, पत्नी आणि मुलांवर खोटे आरोप करायचे याला नामर्दपणा… अक्करमाशापणा म्हणतात, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा आज माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात दरवर्षीच्याच जल्लोषात पार पडला. कोरोना नियमांमुळे सभागृहात पन्नास टक्के उपस्थिती असली तरी बाहेर प्रचंड उत्साह होता, जोश होता. मुख्य म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कुणावर आसुड ओढणार याची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होतीच, पण विरोधकांमध्ये ‘दरारा’ होता.

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो अशी अवघ्या महाराष्ट्राला साद घालत पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली तेव्हा टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला. त्यानंतरच्या तासाभराच्या तडाखेबंद भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपची सत्तेची ‘नशा’ खाडकन उतरवली. तोंडासमोर बेंडकं धरून येता-जाता टीका करणाऱया गल्लीबोळातील टीकाकारांनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. माझे भाषण संपतेय कधी आणि चिरकतोय कधी याचीच वाट काहीजण बघतायत. मात्र तुम्ही चिरकत रहा, माझा वाडा भरभक्कम चिरेबंदी आहे. त्याच्यावर तुम्ही टकरा मारा, तुमची डोकी फुटतील, पण माझ्या वाडय़ाला तडाही जाणार नाही. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या एक तासाच्या तडाखेबंद भाषणात भाजपची अक्षरशः सालटीच काढली.

असले कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत

मी मुख्यमंत्री पद केवळ माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून स्वीकारलं. शिवसेनाप्रुखांना दिलेलं वचन खरं म्हटलं तर अजून पूर्ण झालेलं नाही. मी त्यांना सांगितलेलं आहे की, मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवीन आणि तो मी दाखवीनच (प्रचंड टाळ्या). ही जबाबदारी मी मोठय़ा विचाराने घेतलेली आहे, ही जबाबदारी जी खांद्यावर आहे ती ठामपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही. हे थोतांड नाही… असे सांगताना त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विधानाचा समाचार घेतला… मैं एक फकीर हूं… झोली पेहेन के… झोली बिली हे असे कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे

आरएएसच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवतांनी विचार मांडले… मला मोहनजींना सांगायचंय की, माफ करा. मी जे काही बोलतोय ते तुमच्यावर टीका करतोय असे समजू नका. तुम्ही जे काही सांगत आहात आणि शिवसेनेच्या मेळाव्यात मी जे काही सांगतो आहे ते जर आपलीच माणसे ऐकणार नसतील तर हे मेळावे करायचे कशासाठी? गेल्या वर्षी मोहनजींनी सांगितलं की, हिंदुत्व म्हणजे काय… एक मुद्दा स्पष्ट करतो की, आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितलं आहे. तुम्हीसुद्धा साक्ष आहात की पहिल्यांदा आपण माणूस म्हणून जन्माला येतो. जात-पात-धर्म हा नंतर आपल्याला चिकटतो. मी काय… धर्माचा अभिमान असायला पाहिजे… धर्म पाळला पाहिजे… पण प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरात ठेवायचा… घराबाहेर जेव्हा पाऊल टाकतो तेव्हा ‘माझा देश हाच माझा धर्म’ असला पाहिजे… हेच आमचं हिंदुत्व आहे. पण ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. देश हा आमचा धर्म म्हणून आम्ही वाटचाल करीत असतो. त्या वेळी जर कोणी आमच्या वाटेत स्वतःच्या धर्माची मस्ती घेऊन अडथळा आणला तर आम्ही त्याच्यासमोर कडवट देशाभिमानी, राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून उभे राहिल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

त्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते?

मोहन भागवत यांनी म्हटलंय की, हिंदुत्व म्हणजे काय, या आपल्या देशात सर्वांचे पूर्वज एक होते. हो आहेत. हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का? आता जे काय शेतकरी आंदोलन करताहेत त्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आलेत काय? लखीमपूरला जे शेतकरी दिवसाढवळ्या मारले, त्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते काय, असा परखड सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

सत्तेचे व्यसन हासुद्धा अमली प्रकारच आहे!

मोहनजी म्हणतात, हिंदुराष्ट्र हा शब्द जेव्हा संघ वापरतो तेव्हा त्यात सत्तापिपासूपणा नसतो. सत्ता मिळवण्याची लालसा नसते. तर सर्वसमावेशक असा हा शब्द वापरला जातो. सत्तेसाठी संघर्ष करताना विवेक वापरावा. वैचारिक लढा हवा… युद्ध नको…! मग तुमच्या विचारधारेतून जी लोकं बाहेर पडली आहेत, सत्ता काबीज करून बसली आहेत, त्यांना ही शिकवणी परत लावा एकदा. सध्या जो काय खेळ चालू आहे… वाटेल ते करायचं, पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधिनता हा जो प्रकार आहे… अमली पदार्थांचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हासुद्धा एक अमली प्रकारच आहे. बाजार उद्यान समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अमलाखाली पाहिजे हासुद्धा एक अमली प्रकारच आहे. या अमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार, असा सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

टाकला छापा… काढला काटा… ही असली थेरं चालणार नाहीत!

पुढच्या महिन्यात या तुमच्या हक्काच्या सरकारला दोन वर्षं पूर्ण होतील (प्रचंड टाळ्या… शिवसेना झिंदाबादच्या घोषणा). अनेक प्रयत्न केले. फोडण्याचे प्रयत्न केले, पाडण्याचे प्रयत्न केले. मी तर आजसुद्धा सांगतो की, हिंमत असेल तर पाडून दाखवा. पण तसं करून पडत नाही, मग आपल्याकडे तो खेळ आहे ना – छापा की काटा, छापा टाकायचा आणि काटा काढायचा (टाळ्या). मग तिथून विचारतात, टाकला छापा… काढला काटा… ही असली थेरं चालणार नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या धोरणांवर आसूड ओढले.

संघराज्यावर खुलेपणाने चर्चा झाली पाहिजे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात संघराज्यावर खुलेपणाने चर्चा झाली पाहिजे. केंद्राचे अधिकार किती, राज्याचे अधिकार किती ते एकदा समजूद्या. जेव्हा ही घटना बनत होती तेव्हाही हा वादविवाद झाला होता, अनेक विचारवंतानी शंका उपस्थित केल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रश्न विचारला होता. ही सर्व कलमं घटनेत आल्यावर केंद्राच्या दडपणाखाली ही राज्यं राहतील काय? राज्यांना अधिकार काय? तर केंद्र वरती आणि राज्य खालती राहतील.

त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठामपणे सांगितले होते की, हे अजिबात होणार नाही. केंद्राएकढीच सर्क राज्यं सार्कभौम आहेत आणि सार्कभौम राहतील. केंद्राला आणि राज्यालासुद्धा केंद्राच्या बरोबरीचे हक्क दिलेले आहेत. फक्त तीन गोष्टी आहेत आणि त्यावेळेलाच केंद्र राज्यांच्या अधिकारात हस्तक्षेप करू शकते. एक ः आणीबाणीजन्य परिस्थिती, दुसरे ः परकीय आक्रमण, तिसरे ः विदेशांसोबतचे संबंध कसे असावेत याबाबतचे धोरण ठरवण्याचे अधिकार केंद्र घेऊ शकते. अन्यथा जर केंद्राने राज्यांच्या अधिकारात ढवळाढवळ केली तर ते घटनाबाह्य ठरेल, म्हणजे थोडक्यात घटनेची दुर्घटना होईल.

उद्धव ठाकरे म्हणाले, मला यावर गल्लीबोळातील बोलणाऱयांची मते नकोत, तर देशातील विचारवंतांचे विचार आणि तज्ञांची मते हवी आहेत, त्यांचे सल्ले हवेत. यावर उघड चर्चा होऊन जाऊ देत. जर घटनेने आम्हा राज्यांना केंद्राएवढेच सार्कभौमत्व दिले असेल तर मग मात्र केंद्राची लुडबुड होता कामा नये, रोजच्या कारभारात चालू दिली नाही पाहिजे. हे देशातील सर्व राज्यांनी ठरविण्याची वेळ आली

दिल्लीच्या तख्ताला दाखवावंच लागेल!

देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. तेव्हा लाल, बाल, पाल… म्हणजे महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब ही तीन राज्य स्वातंत्र्यलढय़ात पुढे होती. बंगालने त्यांचे कर्तृत्व दाखवले आहे. मी खरोखर ममताजी आणि बंगालच्या जनतेचे अभिनंदन करतो. त्यांनी जी न झुकण्याची जिद्द कायम ठेवलेली आहे तीच जिद्द आपल्या रगारगामध्ये, नसामध्ये आहे. त्यासाठी आपली तयारी ठेवावी लागेल. हरहर महादेव हे काय असतं हे कदाचित पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखविण्याची वेळ येऊ नये, पण आलीच तर दाखवावंच लागेल, असा जबरदस्त तडाखा उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला लगावला.

हिंदुत्वाला धोका होता तेव्हा…

मी शिवाजीपार्कच्या दसरा मेळाव्यात माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाही असं म्हणालो होतो. तेव्हा काय उन्माद माजला होता सगळीकडे. त्यावरही भागवत बोलले आहेत की, झुंडबळी घेणारे हिंदू नाहीच. मग हिंदुत्व आहे तरी काय… कोणी कोणाला शिकवायचं आणि कोणाकडून शिकायचं? जर हिंदुत्वाला धोका नाही हे आजचं सत्य असेल तर मग जेव्हा हिंदुत्वाला धोका होता तेव्हा एकच मर्द हिंदुत्वासाठी उभा राहिला होता तो म्हणजे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांनी सांगितलं होतं, धमक्या येताहेत… पण ज्या रंगाची गोळी माझ्या शरीराला स्पर्श करून जाईल तो रंग या हिंदुस्थानातून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही (घोषणा ः आवाज कुणाचा, शिवसेनेचा), याची आठवण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला करून दिली.

तुमच्या पालख्या वाहत नाही

1992-93 साली कोणी घेतली होती जबाबदारी. आज जे छाती पुढे काढताहेत, शेपटय़ा पुढे काढताहेत ते तेव्हा त्यांच्या शेपटय़ा आत टाकून बिळात लपले होते. तेव्हा मुंबई वाचवली होती ती पोलिसांच्या मदतीने नाही, लष्कराच्या तर नाहीच नाही. तोच शिवसैनिक केवळ तुमची आज पालखी वाहत नाही म्हणून भ्रष्टाचारी झाला? त्याच्यावर आरोप करताय, असा परखड सवाल करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मागेही मी सांगितलं, आजसुद्धा सांगतोय – होय आम्ही पालखीचे भोई आहोत. जरूर आहोत. ती आमची राष्ट्रभक्तीची, देशभक्तीची आणि हिंदुत्वाची पालखी आहे.

स्वतःमध्ये धमक असेल तर आव्हान द्या…

अंगावर आल्यावर शिंगावर घेण्याची भाषा करीत असाल, स्वतःमध्ये धमक असेल तर आणि तर बोला… ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स याच्या माध्यमातून देऊ नका (शिवसेना झिंदाबादच्या घोषणा). मीसुद्धा पक्षप्रमुख म्हणून आव्हान द्यायचं झालं तर माझ्या या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून देईन… त्यांच्या ताकदीवर देईन… मुख्यमंत्री म्हणून देणार नाही. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं याला नामर्द म्हणतात, हे मर्दाचं लक्षण नाही, हिंदुत्वाचं तर नाहीच नाही, अशा शब्दांत केंद्रीय यंत्रणांच्या वापरावर उद्धव ठाकरे यांनी ताशेरे ओढले.

फाडायला वेळ लागणार नाही!

ही जी थेरं चाललीत ना हे हिंदुत्व नाही… कुणाच्याही कुटुंबावर वैयक्तिक आरोप, पत्नीवर, मुलावर खोटे आरोप करणं हे हिंदुत्व नाही. याला नामर्द, ंिकबहुना अक्करमाशीपणा म्हणतात. मर्द कसा… शिवरायांचं नाव घ्यायचं तर मर्दासारखा समोर यायला पाहिजे. कुणाच्या तरी आडून लपून हल्ले करायचे आणि मग तो मी नव्हेच? षंढ आहेस तू, असा जोरदार फटकारा भाजप नेत्यांना लगावताना उद्धव ठाकरे यांनी आज ही माझी वडिलांपासून आजोबांपासून आलेली शब्दसंपत्ती वापरू द्या, असे शिवसैनिकांना उद्देशून बोलताच घोषणांनी सभागृह दणाणले. ते पुढे म्हणाले, शब्दसंपत्ती दोघांचीही आहे माझ्याकडे, पण माँचे संस्कार आहेत म्हणून ते वाचताहेत (हशा), नाहीतर फाडायला काही वेळ नाही लागणार. छापा-काटा जे मी म्हणालो, त्यात काटा कसा असतो हे बोचत नाही तोपर्यंत… बोचल्यावर कळेल, असा जबरदस्त टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

मोठा पक्ष म्हणवतात, आणि उमेदवार उपरे लागतात

सत्तापिपासूपणा किती? दोन पोटनिवडणुका आल्यानंतर… एक पंढरपूरची झाली, आता दुसरी लागली आहे. पण दोन्ही पोटनिवडणुकांत यांच्याकडे स्वतःचे उमेदवार नाहीत. उपरे लागतात उपरे आणि जगातला मोठा पक्ष. काय मोठा पक्ष आहे, उमेदवारच नाही, उपरे घ्यावे लागतात. उपरे आणून आणून प्लॅटफॉर्मवरची गर्दी जमवली आहे, (हशा) असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उत्तर प्रदेशमधले भारतभूषण आहेत का?

26 नोव्हेंबरचा अतिरेकी हल्ला कोणी विसरू शकत नाही. तुकाराम ओंबळे, करकरे, कामटे या जबाबदार अधिकाऱयांनी बलिदान केलं. तेव्हा अतिरेक्यांशी दोन हात करणाऱया माझ्या पोलिसांचं कौतुक करायचं की माफिया बोलायचं. एक गोळी त्यांचा हृदयाचा किंवा डोक्याचा छेद घेऊ शकत होती, पण त्यांनी पर्वा केली नाही. जसा सैनिक सीमेवर लढतोय त्याच जिद्दीने लढणारे माझे पोलीस आहेत. त्यांचा मला अभिमान आहे. पण शिमगा करायला जाताय म्हणून अडवलं म्हणून माझे पोलीस माफिया? तर त्या अखिलेश यादवला अडवलं, प्रियंकाला अडवलं, छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांना अडवलं… मग उत्तर प्रदेशचे पोलीस काय भारतभूषण आणि भारतरत्न आहेत? लखीमपूरला जे काही घडलं तिकडचे पोलीस का नाही त्यांना अडवू शकले, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

आपण देशासाठी काय केलंय, हे स्वतःला विचारावं

राजनाथसिंह यांनी सावरकरांवर केलेलं एक विधान वादग्रस्त ठरलं. कशाला जाताय तिकडे. सावरकर आणि गांधीजी उच्चारण्याची आपली लायकी तरी आहे का? यांना गांधीजी समजलेत का सावरकर समजलेत? हा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. अमृत महोत्सवी असं काय आपण केलं आहे. पूर्वी ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी हालअपेष्टा सोसल्या ते जर आपल्यासमोर उभे राहिले तर त्यांना आपण काय सांगणार आहोत, काय केलंय आपण देशासाठी. सावरकर आणि गांधींजींवरून चिरकूट वाद घालणाऱयांनी आधी हे स्वतःला विचारायला हवं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

वाचा आणि थंड बसा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्मिकमधील लेखाची ‘वाचा आणि थंड बसा’ या सदराची आठवण करून देताना केंद्र सरकारच्या दोन निर्णयांची माहिती दिली.
z केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचा फतवा, देशातील 11 बंदरांचा सीएसआर फंड गुजरातकडे वळवला, हे सांगताना का महाराष्ट्र या देशाचा घटक नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 75 टक्के निधी वळवला. बऱयाचशा संस्था भाजप तसेच संघाशी संबंधित असलेल्या संस्थांना सीएसआर फंडातून देणगीची खिरापत वाटण्यात आली. ही गंभीर बाब माहिती अधिकारात समोर आलेली आहे. वाचा आणि थंड बसा!
z मोदी सरकार आल्यानंतर गुजरातचा निधी साडेतीनशे कोटींनी वाढला. थेट संस्थांकडे गेला हे ‘कॅग’चे ताशेरे आहेत. हे सर्व चाललेलं आहे आपल्या देखत. वाचा आणि थंड बसा.

मराठी-अमराठी एकजूट बांधा

बंगालचं मी अभिनंदन केलं, पण ती तयारी महाराष्ट्रात असायला हवी. कोणी किती वार केला तरी त्याची तलवार मोडून त्याचं पार्सल परत पाठवण्याची हिंमत, धमक तुमच्यात आहे…असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच शिवसैनिकांन हो! अशी साद दिली. ते पुढे म्हणाले, हिंदुत्व खरोखर आता धोक्यात आहे. कारण हिंदुत्वाची शिडी चढून जे वर चढलेले आहेत. ते आता ब्रिटिशांची निती अवलंबतील…तोडा फोडा आणि राज्य करा. मराठी आणि अमराठी वेगळे करतील. मराठी लोकांत जातीपातीच्या भिंती उभ्या करतील आणि सत्तेची गाजरे खायला बसतील, खायला देणार आहात तुम्ही… (शिवसैनिकांमधून आवाज नाही…नाही..) मग शिवसेनाप्रमुखांनी जो संदेश दिला होता, मराठा, मराठेतर, स्पृश्य-अस्पृश्य, घाटी-कोकणी हा भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा. या एकजुटीबरोबर आणखी एकजूट बांधायची ती म्हणजे मराठी- अमराठी हा भेदभाव गाडून हिंदूंचीसुद्धा भक्कम एकजूट बांधा. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसा हिंदू तितुका मेळवावा, हिंदुस्थान धर्म वाढवावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

ठाण्यातील शिवसैनिकांचे अभिनंदन

पहिल्या प्रथम मी एकनाथ शिंदे आणि ठाण्यातल्या शिवसैनिकांना धन्यवाद देतो. कारण त्यांनी नवरात्रीत नऊ दिवस रक्तदान यज्ञ राबवला. नवरात्रीच्या नऊ दिवसांत ठाणेकरांनी रक्तदान करून विक्रम केलेला आहे. कोणत्या तरी पक्षात ही जाग आहे का? समाजसेवा, हिंदुत्व हे रक्तात असावं लागतं आणि रक्तपिपासूपणा नव्हे तर रक्तदान करणे हासुद्धा धर्म आहे. असं एवढं विक्रमी शिबीर कोणी घेऊन दाखवावं, असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील शिवसैनिकांचे अभिनंदन केले.

‘काम’ हेच आमचे वक्ते!

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दरवर्षी सुरुवातीला इतर नेत्यांची भाषणे होतात. मात्र या वर्षी दसरा मेळाव्यात नवी संकल्पना सुरू करीत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ‘काम हेच आमचे वक्ते!’ असल्याचे गौरवोद्गार या वेळी मुख्यमंत्र्यांनी काढले. कोरोना लढय़ासह शिवसेना आणि पालिकेच्या मुंबईत झालेल्या विकासकामांच्या गौरवगाथेची चित्रफीत मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी तयार केली.

यावेळी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते, उपनेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी केले.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं की, हिंदुत्वाला धोका नाही. याच क्षणाची तर आपण वाट बघत होतो. पण हिंदुत्वाला धोका नाही म्हटल्यानंतर आता खरं हिंदुत्व धोक्यात आहे ते परक्यांपासून नाही तर उपटसुंभ नवहिंदू उगवले आहेत त्यांच्यापासून

भाजपमध्ये गेलेली लोकं ब्रँड ऍम्बेसेडर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विधानावरूनही भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, हर्षवर्धन पाटील परवा अनाहूतपणे बोलून गेले की, भाजपात का गेलो… खरं म्हणजे अशी जी भाजपमध्ये गेलेली लोकं आहेत ती भाजपची ब्रँड ऍम्बेसेडर झाली पाहिजेत, असा टोला लगावतानाच पक्षप्रमुख ठाकरे यांनी जाहिरातीचे उदाहरण दिले. टीव्हीवर जाहिराती येतात… एक कोणतरी गोरा माणूस दाखवतात… तो बोलतो, ‘‘पहिले तो मुझे निंद नही आती थी… दरवाजे पर टकटक होती तो रोंगटे खडे हो जाते थे… फिर किसी ने कहा की तूम भाजपा में जाओ (हशा आणि टाळ्या). भाजप में जाने के बाद में कुंभकर्ण की निंद सो सकता हूं… दरवाजे पर ठोका तोभी में उठता नहीं हूं (हशा आणि शिट्टय़ा).’’ असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार आसूड ओढले. ते म्हणाले, काय लायकीची माणसं आहेत आणि ही आपल्या अंगावर येताहेत… आपल्याला आव्हान देताहेत… हिंमत असेल तर अंगावर या. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पण अंगावर आला तर सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावर… लायकी तरी आहे का… पात्रता तरी आहे का, अशा शब्दांत भाजपवाशी होऊन शिवसेनेवर टीका करणाऱयांचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.

शिवसेनाप्रमुखांचा पुतळा रोषणाईने उजळला!

दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरातील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर उभारण्यात आलेला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला आता कायमस्वरूपी रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

फटकारे

सर्वसामान्य माणसाला मला हेच सांगायचं आहे की, अरे तू सर्वात ताकदवान माणूस आहेस. तुझ्या हातात जे लोकशाहीने दिलेले शस्त्र आहे ते आहे मत. आणि हे मत एका क्षणात रावाचा रंक आणि रंकाचा राव करू शकतं, एवढी ताकद तुझ्या मनगटात आहे, तू दुबळा नाहीस.
वैचारिक लढा ठीक आहे, यात कुठला विचार आहे. मला राग या गोष्टीचा येतो की, मी बोलल्यावर हे तोंडात बोळकं घालून चिरकायला लागतात. मग 92-93 साली जर शिवसैनिक उतरला नसता तर तुमचं तोंड आणि बोळकं कुठं असतं हे तुम्हाला तरी कळलं असतं का?
हर्षवर्धन पाटील आज तुमच्यामध्ये आले तेव्हा पवित्र झाले. म्हणजे गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं की गंगा आणि तेच पाणी दुसरीकडे टाकलं तर गटारगंगा?
काटा कसा असतो हे बोचत नाही तोपर्यंत… बोचल्यावर कळेल.

फटकारे

एकतर्फी प्रेमात नराधम जसा मुलीवर ऍसिड फेकतो तसा महाराष्ट्राने तुम्हाला नकार दिला म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आणि प्रतिमेवर ऍसिड फेकता? कुठे फेडाल हे पाप!
केंद्राची लुडबुड कदापि खपवून घेणार नाही
हर हर महादेव म्हणजे काय हे दिल्लीच्या तख्ताला दाखवून द्यावेच लागेल
मराठी माणसाची आणि हिंदूंची एकजूट करा! हिंदू तितुका मेळवावा!! हिंदुस्थान धर्म वाढवावा!!!

शिवसैनिक हीच माझी शस्त्र्

परंपरेनुसार यावेळी शस्त्रपूजन करण्यात आले. हे पूजन झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर पुढे येऊन हातातील ओंजळभर फुले समोर उपस्थित शिवसैनिकांवर उधळली. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही समोर बसलेले शिवसैनिक हीच माझी शस्त्र्ाs आहात. तुमचा आशीर्वाद घेताना एक नम्र भावना मनात आहे – प्रत्येक जन्मी मला हेच आई-वडील मिळावेत, हेच कुटुंब-परिवार मिळावा आणि माझा जन्म महाराष्ट्रातच व्हावा! मला स्वतःलाच काय, पण जनतेला मी मुख्यमंत्री आहे असे वाटता कामा नये तर मी त्यांच्या कुटुंबातील एक आहे असे वाटले पाहिजे. पद, सत्ता येईल, जाईल. मी कुणीतरी आहे हा अहंपणा डोक्यात नको असे सांगतानाच मी पुन्हा येईन असे म्हणणारे आता मी गेलोच नाही असे म्हणू लागले आहेत. मग आता बसा आहात तिकडे, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

चिरकणाऱयांना चिरकू द्यात… ते रोजगार हमीचं काम झालंय!

आज मी काय बोलणार, कुणाचा समाचार घेणार… कुणाचे वाभाडे काढणार… याचे आडाखे बांधले जात होते. मी बऱयाच दिवसांनंतर बोलतोय. मनात विचारांची गर्दी झालीय, पण कोरोनात गर्दी नाही चालत (हशा). बरं गर्दीत प्रत्येकाला दोन व्हॅक्सिन घेतलेस का रे बाबा हे विचारूही शकत नाही. विचारांना कसं विचारणार? विचारांना मास्क कसा घालणार? असे मिष्किलपणे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, चिरकणाऱयांना उत्तर देण्यासाठी मी बोलत नाही तर मी तुमच्यासाठी बोलतो आहे… मी माझ्या जनता जनार्दनासाठी बालतो आहे, एक विकृती हल्ली आली आहे. काही वाटेल ते बोलायचं आणि कुटुंबीयांवर हल्ले करायचे हे त्यांच्या आता रोजगार हमीचं काम झालेलं आहे. काय करणार, कोरोनात सगळं बंद आहे, मग काय करायचं – तू चिरकलायस किती… हे त्याचे पैसे… नुसतं चिरकत रहा… अशा शब्दांत पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवाल्यांची सालटी काढली.

दिलेले वचन त्यांनी पाळले असते तर…

ज्यांना अजूनही वाटते की ते मुख्यमंत्री आहेत. ते राहिले असते. जर तुम्ही शिवसेनेला दिलेले वचन मोडले नसते तर कदाचित आज ना उद्या तुम्हीदेखील पुन्हा मुख्यमंत्री झाला असता. पण तुमच्या नशिबात नव्हतं म्हणून तुम्ही वचन मोडलं. जर का दिलेले वचन त्यांनी पाळलं असतं आणि शिवसैनिक मुख्यमंत्री केला असता तर मी कदाचित हा शब्द वापरतोय… कदाचित मी या राजकीय जीवनातून बाजूलादेखील झालो असतो. कारण हे क्षेत्र माझे नाही, अशी टीका माझ्यावर होते. हो, हे क्षेत्र माझे नाही. पण मी एक पुत्रकर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रामध्ये आलो आणि पाय रोवून ठामपणे उभा राहिलेलो आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.

अमली पदार्थांचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हासुद्धा एक अमली प्रकारच आहे. बाजार उद्यान समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अमलाखाली पाहिजे हासुद्धा एक अमली प्रकारच आहे. या अमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार?