तुम्ही स्वबळ वाढवणार आणि आम्हाला भिकेला लावणार, हे चालणार नाही! उद्धव ठाकरे यांची तुफान फटकेबाजी…

uddhav-thackeray

‘‘काही जण स्वबळाचा नारा देत आहेत. तसा आपणही देऊ, तो आमचा हक्क आहे, अधिकार आहे. मात्र स्वबळ म्हणजे नेमके काय हे आधी समजून घेतले पाहिजे. कोविडनंतरची स्थिती भीषण आहे. आपले काय होणार ही अस्वस्थता प्रत्येकाच्या मनात आहे. रोजगार गेला आहे, जवळची माणसे कोरोनाने हिरावून नेली आहेत. सर्वत्र विदारक चित्र आहे. जनतेची ही चिंता लक्षात न घेता कुणी स्वबळाचा नारा दिला तर लोक जोडय़ानं हाणतील. तुझं बळ तू वाढवणार आणि आम्हाला भिकेला लावणार हे खपवून घेणार नाही असे लोक म्हणतील. अशा स्थितीत एक अस्वस्थता उफाळून येईल हे लक्षात ठेवा’’, असा इशाराच आज शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनी राज्यासह देशभरातील शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींशी ऑनलाइन संवाद साधताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी आणि फटकेबाजी केली. सद्य राजकीय स्थितीवर परखड भाष्य करताना त्यांनी विरोधकांना खडे बोलही सुनावले.

‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी साद सुरुवातीलाच घालताना उद्धव ठाकरे म्हणाले, बऱयाच दिवसांनी माझ्या मनोगताची सुरुवात मी अशी करतो आहे. आता काही वेळासाठी मुख्यमंत्रीपदाची वस्त्र बाजूला ठेवून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. गेल्या 55 वर्षांतील शिवसेनेच्या वाटचालीचे श्रेय कोणा एकटय़ाचे नाही, तर आपल्या कामाने, कष्टाने आणि घामाने ज्यांनी हा पक्ष वाढवला त्यांचे आहे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना अभिवादन केले आणि शिवसेना कुटुंबातील सर्व सदस्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, शिवसेनेचा वर्धापन दिन आणि ‘मार्मिक’चा वर्धापन दिन हे तीन दिवस शिवसैनिकांसाठी ‘सण’ आहेत असे प्रमोद नवलकर म्हणायचे. ते खरेच आहे. मात्र गेल्या दीड वर्षात या नव्या ऑनलाइन माध्यमाद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधावा लागत आहे, असे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा पाच दशकांतील वाटचालीचा लेखाजोखा तर मांडलाच, पण शिवसेनेवर, पक्षाच्या हिंदुत्ववादावर नाहक टीका करणाऱयांचाही यथेच्छ समाचार घेतला.

सत्तेत आल्यानंतर किती काम झाले हे बघून अनेकांना पोटदुखी होत आहे. मुरडा होत आहे. सत्ता नाही म्हणून जीव कासावीस होत आहे. त्यांचे ते बघतील त्यांच्या दुखण्याचा इलाज करण्यासाठी मी काही डॉक्टर नाही. राजकीय औषध द्यायच्या वेळेला मात्र मी जरूर औषध देईन. पण गेली 55 वर्षे शिवसेना अनेक राजकीय पक्षांचे रंग व अंतरंग बघत पुढे चालली आहे. आम्ही अनेकांचे रंग व अंतरंगही पाहिले आहेत. अंतर्मन पाहिले. बाहेर काय असते, आत काय असते तेही पाहिले आहे. या सर्व अनुभवांचे गाठोडे घेत आपण पुढे चाललो आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेचा वर्धापन दिन पंरपरेप्रमाणे सभागृहात साजरा होतो. पण कोरोनाच्या निर्बंधांमुळे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून होत असल्याचा उल्लेख करीत ते म्हणाले की, कोरोनाची माहिती देताना संवाद साधणे हा भाग वेगळा असतो, पण भाषण करणे हा वेगळ अनुभव असतो. कारण भाषण करताना समोर जल्लोष पाहिजे. समोर जिवंत रसरसते शिवसैनिक नसतील तर अशा भाषणाला काही मजा येत नाही. त्यामुळे काही लोक बोलतील, मी बोलतो पण भाषणात जोश नव्हता. जोश असेल कसा? समोर हंशा, टाळय़ा, घोषणा नाहीत, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व व शिवसेनेचा जयजयकार नाही. तो नसताना मी एकतर्फी बोलत आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर तोफ डागण्यास सुरुवात केली.

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व

शिवसेनेने जेव्हा मराठीची भूमिका मांडली तेव्हा आम्ही संकुचित व प्रादेशिक म्हणून टीका झाली. जेव्हा हिंदुत्वावर, माझ्या देशावर संकट आले तेव्हा ‘गर्व से कहो हम हिंदू है’चा नारा शिवसेनाप्रमुखांनी दिला. जसे मराठी म्हणणे कमीपणाचे लक्षण होते तसेच हिंदुत्वाचा उच्चार करणे किंवा हिंदुत्वाचा उच्चार करताना भल्याभल्यांना कापरे भरत होते. त्यावेळेस ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असा बुलंद नारा दिला. त्या शिवसेनेने महाराष्ट्राला आधार दिला. हिंदुत्वाच्या रूपाने देशाला आधार दिला. जेव्हा हिंदुत्वाचा स्वीकार केला तेव्हा धर्मांध म्हणून टीका झाली. पण टीकेची पर्वा करू नका. तुमच्या मनाला काय पटते ते करा. जेव्हा मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढायचे असेल तेव्हा जरूर लढेन. जेव्हा हिंदुत्वासाठी लढायचे असेल तेव्हा जरूर लढेन कारण हिंदुत्व हे आमचे राष्ट्रीयत्व आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. देशाच्या शक्तीचा पाया प्रादेशिक अस्मितेचा आहे. आणि प्रादेशिक अस्मितेवर जर घाला आला तर मग देशाच्या संघराज्याला तडाखे बसल्याशिवाय राहाणार नाहीत. म्हणून जेव्हा जेव्हा शिवसेनेवर प्रादेशिकतेचे, धर्मांधतेचे आरोप होतात पण तेव्हा आरोप करणारे एक गोष्ट विसरतात की, देशावर प्रेम करा हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगणारा शिवसेनेव्यतिरिक्त दुसरा पक्ष नाही. म्हणूनच आम्ही एकमेकांना भेटल्यावर ‘जय महाराष्ट्र’ अशी साद घालतो; पण जय हिंद जय महाराष्ट्र बोलतो. कारण देश पहिला, मग माझा महाराष्ट्र. हे आमचे आयुष्य आहे. हे आयुष्य सोडून चालणार नाही, कारण जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा शिवसेना पुढे सरसावते. कोरोनाच्या काळातही शिवसेना पुढे सरसावली आहे याची आठवण करून दिली.

शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका करणाऱयांचा उद्धव ठाकरे यांची सडेतोड शब्दांत समाचार घेतला. महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टीका करतात; पण हिंदुत्व म्हणजे काही पेटंट नाही. हे माझेच असे नाही. हे गेले म्हणजे हिंदुत्व सोडले असे नाही. हिंदुत्व म्हणजे नेसण्याची, सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व आमच्या ह्रदयात आहे. म्हणूनच हिंदुत्व हा आमचा श्वास आहे असे शिवसेनाप्रमुख सांगायचे. हिंदुत्व सोडले म्हणजे तर आयुष्याला काय अर्थ आहे असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे युती तोडली, आघाडी केली म्हणजे हिंदुत्व सोडले. आता आघाडी किती काळ टिकणार, असा प्रश्न विचारतात. पण त्याची काळजी तुम्ही कशाला करता. आमचा हेतू प्रामाणिक आहे.

कोरोनाच्या संकट काळात सुरू असलेल्या राजकारणाचा त्यांनी समाचार घेतला. सध्या ज्या पद्धतीने देशात राजकारण चालले आहे. हे राजकारणाचे विकृतीकरण-विद्रुपीकरण आहे. तुम्हाला सत्ता पाहिजे तर घ्या. मी अनेकदा सांगितले आहे. की माझ्यासाठी सत्ताप्राप्ती हे कधीच माझे स्वप्न नव्हते. पण एक आव्हान, एक जबाबदारी आली म्हणून स्वीकारावी लागली. काही अनुभव नसताना स्वीकारली, पण आता कौतुक केले जाते. हे माझे काwतुक नाही. हे शिवसैनिकांचे आहे. कारण तुमच्यासारखे शिवसैनिक लाभणे ही माझी कित्येक जन्माची पुण्याई. माझे भाग्य आहे. आणि तुम्ही जर सोबत नसता आणि सोबत नसाल तर मी एक पाऊल पुढे जाऊ शकणार नाही. हे सर्व तुमच्या मेहनतीचे व आशीर्वादाचे फळ आहे.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही राजकारण- स्वबळाची भाषा न करता, कोरोनामुक्त गावाचा नारा दिला. असे कोणताही पक्ष करीत नाही हे त्यांनी अभिमानाने सांगितले. राजकारण बाजूला ठेवून माझे गाव माझी वस्ती कोरोनामुक्त ठेवा असा कार्यक्रम देणारी फक्त शिवसेनाच आहे. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ आम्ही मोहीम हाती घेतली. मागील आठवडय़ात महाआवास योजनेत सव्वा तीन लाख लोकांना घरे दिली तेव्हाही मी त्यांना हेच सांगितले की, माझ्या घरात कोरोना येऊ देणार नाही अशी प्रत्येकाने शपथ घ्या. असे जर प्रत्येकाने ठरवले तर घर, पुढे वस्ती, गाव, जिल्हा आणि महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण हे काम एकटय़ा सरकारचे नाही. ही एक चळवळ झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

फोर्टमधील इमारतींचे दरवाजे उघडले

स्थानिक लोकाधिकार समिती व भारतीय कामगार सेना मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढत आहे. स्थानीय लोकाधिकार समिती शिवजयंतीला पर्ह्ट विभागात शिवराय संचलन करते. मी शिवराय संचलनाला आवर्जून हजेर लावली आहे. फोर्टचा उच्चभ्रू वस्तीचा व ऑफिसचा परिसर आहे. यामध्ये सहभागी होताना माझी नजर चौफेर असते. आजूबाजूच्या मोठय़ा इमारती व मोठय़ा ऑफिसच्या खिडकीतून, गच्चीतून, अगदी झाडावर चढून लोक दुथडी भरून शिवसेनेकडे आणि शिवसेनेच्या भगव्या ताकदीकडे बघत असतात. हे अप्रूप आहे. एक चमत्कार आहे. ज्या काळात शिवसेना नव्हती त्या काळात या इमारतींचे-ऑफिसचे दरवाजे, खिडक्या मराठी माणसासासाठी बंद होते. त्या बंद दरवाजावर धडक मारून- तोडून शिवसेनेने मराठी माणसाला या कार्यालयात घुसवले आणि न्याय मिळवून दिला. हे शिवसेनेचे कर्तृत्व आहे. शिवसेनेच्या मनगटात ताकद नसती, बळ नसते तर शक्य नसते. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या मनगटात ताकद दिली. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सत्तेसाठी लाचारी नाही

भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले की, 55 वर्षे पूर्ण करून शिवसेना पुढे जात आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. यामध्ये शिवसेनेची स्वतःची भूमिका आहेच. आपणही दिशा ठरवली आहे. सत्तेसाठी कधीही लाचार होणार नाही. हे तर आपले व्रत आहे. पण त्याचबरोबरीने आपण उगाचच कोणाची तरी पालखी वाहणार नाही हेही आपल्याला ठरवावे लागेल. शिवसेनेचा जन्म हा न्याय्य हक्कासाठी झालेला आहे. दुसऱयाच्या पालख्या वाहण्यासाठी झालेला नाही. भलत्याच्या पालखीला खांदा देण्यासाठी शिवसेनेचा व शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही. आम्ही चालू ते स्वाभिमानाने-अभिमानाने चालू. अगदी पायात फाटके जोडे असले तरी चालतील, नसले तरी चालतील. पण आम्ही आमच्या पावलांवरती पुढची वाटचाल करू हे शिवसैनिकाचे ब्रीद आणि हीच आमची ताकद आहे. शिवसेना हा एका विचार आहे. तो विचार आपण वर्षोनुवर्षे पुढे नेत राहाणार आहोत.

तर काडकन आवाज येणारच

गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनाप्रमुखांच्या भाषणाचा एक मेसेज व्हायरल होत असल्याचे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, त्यात शिवसेनाप्रमुख म्हणत आहेत, समोरून फटकन आवाज आला तर आमच्याकडून काडकन आवाज येणारच. रक्तपात करणे ही आमची संस्कृती नाही. रक्तदान करणारा शिवसैनिक हीदेखील आमची ओळख आहे. सातत्याने जेव्हा कधी संकट आले तेव्हा शिवसैनिकाने ते सिद्ध केले आहे. आतादेखील कोरोनाच्या संकटात शिवसैनिकांनी दिलेल्या हाकेला ओ देत रक्तदान केले आणि हजारो जीव वाचविले. आरोप करणाऱयांपैकी किती जणांची अशी ओळख आहे? संकटकाळात जो धावून जातो तो शिवसैनिक. बदनामी करणारे आरोप करतच आहेत. राजकारणाचे विद्रुपीकरण ते हेच. आरोप करायला आणि पळून जायचे. स्वतः तू कोण आहेस, आमच्यावर आरोप करण्याआधी तुझा चेहरा तू आरशात पाहिलास का, तुझे चारित्र्य स्वच्छ आहे का? पण आम्ही असे आरोप करत नाही, बदनाम करत नाही. आम्ही रुबाबात चाललो आहोत. शिवसेनेचे राजकारण हपापलेले असते तर शिवसेना टिकलीच नसती, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

संकटाच्या छाताडावर चालून जा

गेल्या 55 वर्षांत शिवसेनेवर अनेक संकटे आली. आजसुद्धा संकटांचा सामना करतोच आहे. पण संकटाला घाबरलो तर मी शिवसैनिक कसा? घाबरलो तर शिवसेनाप्रमुख आणि माँसाहेब मला कदापि माफ करणार नाहीत. आजोबांनी सांगितलेय, संकटाच्या छाताडावर चालून जा. संकटावर चालून जायचे असेल तर आत्मविश्वास पाहिजे आणि स्वबळ पाहिजे. उद्या अनेकजण म्हणतील उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला. पण हा नारा नाही, तर आमचा हक्क आहे, अधिकार आहे. तो केवळ निवडणुकीशी संबंधित नाही, तर अन्यायाविरुद्ध वार करण्यासाठी आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना अनेक पावले पुढे गेली

n हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली त्यास आज 55 वर्षे पूर्ण होत आहेत. शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर आल्यावर पक्षप्रमुख म्हणून शिवसेना दोन पावले पुढे नेईन असे त्यांनी सांगितले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात दोन पावले नाही, तर शिवसेनेला अनेक पावले त्यांनी पुढे नेले याचा ज्येष्ठ शिवसैनिकांना अभिमान वाटत असल्याचे सांगत शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

निवडणुकांनतर सत्तांतर झाले आणि राज्यात तीन पक्षांचे सरकार आले आणि कधी पाहिले नसेल असे कोरोना महामारीचे संकट देशावर आले. सगळे भांबावून गेले. आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली. या परिस्थितीत मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्रे हाती घेऊन राज्यातील जनतेला धीर दिला. मार्च 2020 मध्ये राज्यात जेमतेम 200 रुग्णालये होती. आज 6700 रुग्णालये, 3200 आयसीयू बेडच्या ठिकाणी 32 हजार बेडची व्यवस्था, व्हेंटिलेटर्सची संख्या 1 हजारावरून 12 हजार, चाचणी प्रयोगशाळांची संख्या 3 वरून 573 पर्यंत नेऊन राज्याची आरोग्य व्यवस्था बळकट करण्याचे काम उद्धव ठाकरेंनी सरकारी यंत्रणेला सोबत घेऊन केले. यामुळे कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपविण्यात राज्याला यश आल्याचे देसाई म्हणाले.

कोरोना महामारीच्या संकटात रुग्ण व मृतांची आकडेवारी लपवली नाही, तर प्रामाणिकपणे सर्व माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांसमोर ठेवली. त्यांच्या प्रामाणिकपणाचे काwतुक उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने केले. गुजरात, दिल्ली व पेंद्र सरकारच्या कामकाजावर ताशेरे ओढत असताना मुंबईकडून नियोजन शिका असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. कोरोना संकटात केलेल्या कामाबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पह्न करून काwतुक केले. यामागे कष्ट, प्रामाणिकपणा, सरकारी कामातील पारदर्शकपणा असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले. शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी सूत्रसंचालन केले.

शिवसेनेचे गाव कोरोनामुक्त गाव

‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’प्रमाणेच आपले गाव आणि शहर कोरोनामुक्त करण्याची प्रतिज्ञा सर्व शिवसैनिकांनी करावी. ‘शिवसेनेचे गाव कोरोनामुक्त गाव, शिवसेनेचा प्रभाग कोरोनामुक्त प्रभाग’ हा मंत्र घेऊन पुढे जाऊ. राजकारणात शिवसेना कमी पडणार नाही. त्यामध्ये आपले पाऊल पुढेच पडेल. पाऊल पुढे पडताना जबाबदारीचे भान ठेवून कोरोनाची लढाई लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केले.

घरातून बाहेर पडलो तर…

कोरोना काळात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, विरोधक सातत्याने माझ्यावर मी घराबाहेर पडत नाही, घरातून कारभार करीत आहे म्हणून टीका करीत आहेत. त्यांना मला सांगायचे आहे की, घरातून काम करतोय तर एवढे काम होत आहे मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मी सातत्याने राज्यातील जनतेला घराबाहेर पडू नका, घरातच राहा असे आवाहन करीत आहे. अशावेळी मीच घराबाहेर पडतोय हे मला बरोबर वाटत नाही. मात्र लवकरच बाहेर पडणार आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

ममता लढल्या, जिंकल्या… स्वबळ दाखवून दिले!

निवडणुका लढणे आणि जिंकणे म्हणजे स्वबळ नव्हे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील यशाबद्दल ममता बॅनर्जी यांचे खास अभिनंदन केले. ते म्हणाले, ममता जिंकल्या तरी मी बंगाली जनतेचे विशेष काwतुक करेन. ममता यांनी बंगालची ताकद दाखवली. अनेक आरोप झाले, हल्ले झाले. मात्र बंगालच्या जनतेने ते सर्व झेलून आपले मत निर्भीडपणे मांडले. आपली ताकद, स्वत्व दाखवून दिले. अस्मिता कशी जपावी हे दाखवून दिले. यालाच म्हणतात स्वबळ. स्वबळ हे असे असले पाहिजे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. ज्या बंगालने ‘वंदे मातरम्’ दिले. क्रांतीचा महामंत्र दिला. स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारक दिले त्याच बंगालने प्रादेशिक अस्मिता कशी जपावी हे देशाला दाखवून दिले. एक उदाहरण घालून दिले. निवडणुका होतात, जातात. कोण हरले, कोण जिंकले हा विषय गौण आहे. पण बंगाली जनतेने जे मत मांडले त्याचे खास काwतुक करावेच लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

स्वबळ म्हणजे काय?

– शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘स्वबळा’चा नारा देणाऱयांना चांगलेच तडकावले. ते म्हणाले, स्वबळ म्हणजे नेमके काय हे आधी समजून घेतले पाहिजे. केवळ निवडणुकीसाठी स्वबळ असू नये. उद्धव ठाकरे आणखी काय म्हणाले…

– न्याय्य हक्क मागण्यासाठीदेखील स्वबळ लागते. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल तर वार कसा करणार?

– तुमच्यात आत्मविश्वास नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून तलवार उचलण्याची ताकद आधी मनगटात येऊ द्या.

– अभिमानाचे, स्वाभिमानाचे स्वबळ हवे.

– न्याय्यहक्क मागण्यासाठी स्वबळ लागते.

– तलवार उचलण्याची ताकद कमवावी आणि मग वार करावा. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे.

– निवडणुका येतात-जातात. जय पराजय होत असतो. पण हरल्यानंतरसुद्धा पराभूत मानसिकता घात करते. मनाने खचला तो संपला.

– कोविडनंतर काय परिस्थिती उद्भवणार आहे याचा विचार करावाच लागेल. अनेकांच्या घरात कर्ता माणूस गेला. कित्येकांचे रोजगार बुडाले आहेत. काहींची रोजीरोटी मंदावली आहे. देश चिंतेत आहे. देशवासीय चिंतेत आहेत. अशा वातावरणात सत्तेसाठी स्वबळाची भाषा करणाऱयांना लोक जोडय़ाने मारतील.
शिवसेना हा केवळपक्ष नाही, तो एक विचार आहे. तो अखंड सुरू राहणार. एका पिढीकडून दुसऱया पिढीकडे प्रवाहित होत राहणार. शतकानुशतके सुरूच राहणार.

– हिंदुत्व हे कुणाचं पेटंट नाही. ती नेसण्या–सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व आमच्या हृदयात आहे. हिंदुत्व हा आमचा श्वास आहे!

– सत्ता नाही म्हणून अनेकांचा जीव कासावीस होतोय. अनेकांच्या पोटात दुखतेय. मुरडा येतोय. त्यांचं ते पाहतील. पण त्यांना राजकीय औषध द्यायचे तेव्हा जरूर देईन.

– अनेकजण विचारतात, आघाडी किती काळ टिकणार? बघूया ना! असेच पुढे जाऊ. आमचा हेतू प्रामाणिक आहे. राज्याचा विकास हेच ध्येय आहे.

बाकीच्यांनी आमची चिंता करू नये. आम्ही खंबीर आहोत.

वर्धापनदिनी राजकीय कार्यक्रमदेण्याऐवजी कोरोनामुक्तीचा कार्यक्रम देणारे कोणी नसतील. कोरोनामुक्ती हा केवळ उपक्रम न राहता ती चळवळ व्हायला हवी. जनसहभाग होत नाही तोपर्यंत चळवळ यशस्वी होत नाही. प्रत्येकाने माझे घर कोरोनामुक्त ठेवेन! हा संकल्प करावा. त्यामुळे घर, गाव आणि महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल.

आपली प्रतिक्रिया द्या