शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन, पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद

शिवसेनेचा शनिवारी 55 वा वर्धापन दिन आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे ओसरले नसल्याने यंदाही हा वर्धापन दिन शिवसेनेच्या वतीने साधेपणाने आणि सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जाणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत.

शिवसेनेचा वर्धापन दिन दरवर्षी मोठय़ा उत्साहात आणि थाटामाटात साजरा होतो. देशाच्या कानाकोपऱयातील हजारो शिवसैनिक त्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदाही सलग दुसऱया वर्षी परंपरेप्रमाणे वर्धापन दिनाचा सोहळा भव्य स्वरूपात करता येणार नाही. मात्र सद्यस्थितीत समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेली आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, जनजागृतीचे कार्यक्रम व अन्य समाजोपयोगी उपक्रम ठिकठिकाणी राबवून वर्धापन दिन साजरा होणार आहे, अशी माहिती शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी दिली.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या वर्षीप्रमाणेच वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी ऑनलाइन संवाद साधणार असून त्याचे प्रास्तविक शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई हे करणार आहेत. शिवसैनिकांनी कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करून वर्धापन दिन साजरा करावा अशा सूचना शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आल्या आहेत. शिवसेनेची प्रत्येक शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयात निवडक शिवसैनिकांच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता भगवा ध्वज फडकवण्यात यावा. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात यावी. विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात यावेत. कोरोनाबद्दल जनजागृती करण्यात यावी, असे कळवण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या