
ऑक्सिजनची सुविधा असणारे तब्बल दोन हजार बेड, डायलेसिस, आयसीयू आणि प्रभावी क्वारेंटाइन असणारे 2500 खाटांचे देशातील सर्वात मोठे ‘कोरोना हेल्थ सेंटर’ गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये पालिका उभारत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी या कोविड हेल्थ सेंटरची पाहणी केली. या ठिकाणी बाराशे बेड उभारण्याची सुविधा दुप्पट म्हणजेच 2500 करून पुढील आठवड्यापासून कोरोना हेल्थ सेंटर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ही माहिती दिली.
मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सर्वसुविधा असलेले बेड उपलब्ध करण्यास वेगाने सुरुवात केली आहे. यामध्ये गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सुरुवातील बाराशे बेड सुरू करण्याचा निर्णय घेऊन कामही सुरू करण्यात आले आहे. मात्र जादा सुविधा उपलब्ध होण्यासाठी या नेस्को सेंटरमध्ये पंचवीसशे बेड सुरू करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले. त्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. नेस्कोतील ‘कोविड हेल्थ सेंटर’ देशातील सर्वात मोठे कोरोना हेल्थ केअर सेंटर ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर आदी उपस्थित होते.
डायलेसिस, आयसीयूसाठी 300 बेड
नेस्को सेंटरमध्ये पाच मोठे हॉल आहेत. या ठिकाणी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात येत आहे. नेस्को सेंटरमध्ये बाराशे बेडच्या व्यवस्थेमध्ये सुरुवातीला आयसीयू किंवा डायलेसिस बेडची सुविधेचे नियोजन नव्हते, मात्र आता खाटांची संख्या वाढवतानाच 300 बेड डायलेसिस, आयसीयूसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. नेस्कोत पार्किंगसाठी असणार्या जागेच्या ठिकाणी या बेडची सुविधा निर्माण करता येईल. 40 बेड डायलेसिस कोविड पेंशंटसाठी राखीव असतील. 30 टक्के बेड आयसीयूसाठी आणि इतर बेड हायरिस्क, कोविड पेशंटसाठी राखीव ठेवण्यात येतील.
पुढील आठवड्यात सुविधा सुरू
नेस्को सेंटरमध्ये कोरोना हेल्थ सेंटरचे काम याआधीच सुरू झाले असून आतापर्यंत सुमारे एक हजार बेडचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून या ठिकाणी कोरोना पेशंटसाठी आरोग्य सुविधा सुरू करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली. शिवाय पंचवीसशे बेड उभारणीचे काम मे महिनाअखेपर्यंत पूर्ण होईल. इतकी मोठी क्षमता असल्यामुळे आरोग्य कर्मचारी-रुग्णांसाठी सुविधा, जेवळ, स्वच्छतागृह अशा सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू असल्याचेही ते म्हणाले.

























































