तुमच्या हिताचेच निर्णय घेणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साधला पुरग्रस्तांशी संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हे सरकार तुमचेच आहे, तुमच्या हिताचेच निर्णय घेणार अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरग्रस्तांना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी सांगलीतील अंकलखोप आणि भिलवडीच्या पुरग्रस्तांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या आपत्तीत तुम्हाला पायावर उभे करायची जबाबदारी आहे.  ही  अतिवृष्टी होण्याअगोदरपासून या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे.  पावसाळ्या नंतर येणारे आजार होणार नाहीत यासाठी प्रशासनास सूचना दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच सर्वांची निवेदने मी घेत आहे. सर्वांच्या सूचनांचा स्वीकार करणार असून यावर उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली जाईल. पूर दरवर्षी येतो, दरवर्षी मुख्यमंत्री, मंत्री येणार आणि चौकशी करून जाणार. असेच आयुष्य जगायचे का ?  असं काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे. घर- दार, शेती यांचे किती नुकसान झाले याची आकडेवारी घेतली जात आहे. आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे तेच करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अतिवृष्टीचा इशारा येताच या भागातील लोकांचे प्रशासनाने लगेच स्थलांतर केले, जीव जाऊ दिले नाहीत असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाचे कौतुक केले. तसेच हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार अशी ग्वाही देत कृपा करून गर्दी करू नका. मास्क घालत राहा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.