मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटला दिली भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खा. गिरीश बापट, आ. चेतन तुपे, सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता उपस्थित होते.

 कोरोना प्रतिबंधक लस ‘कोविशिल्ड’ची निर्मिती करणाऱया पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या मांजरी येथील एका इमारतीला भीषण आग लागली होती. या आगडोंबामध्ये 5 कंत्राटी कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीने प्रयत्न केले आणि दोन तासांत आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोविशिल्ड लसनिर्मिती प्लांट पूर्णपणे सुरक्षित आहे. आग कशामुळे लागली याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

जगातील सर्वात मोठी लसनिर्मिती कंपनी असलेल्या सीरम इन्स्टिटय़ुट ऑफ इंडियाचे हडपसर आणि मांजरी येथे विविध लसींच्या निर्मितीचे प्रकल्प आहेत. मांजरीतील प्रकल्प शंभर एकरावर आहे. दुपारी 2.45 च्या सुमारास एसईझेड-3 इमारतीच्या पाचव्या मजल्याला आग लागली आणि काही मिनिटांत आगीने रौद्ररूप घेतले. धुराचे प्रचंड लोट पसरले.

आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे शंभरावर जवान, 15 बंब, पाण्याचे टँकर्स घेऊन घटनास्थळी धावले. दोन तास शर्थीने प्रयत्न केले. त्यानंतर आग आटोक्यात आली.  आग आटोक्यात आल्यानंतर पुन्हा भडकण्याची शक्यता लक्षात घेऊन रात्री उशिरापर्यंत येथे कुलीन ऑपरेशन सुरू होते.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांना पाच कामगारांचे मृतदेह सापडले. 9 कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याला दुजोरा दिला आहे.

वेल्डिंगच्या कामा दरम्यान आग लागली असावी – महापौर

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार या इमारतीचं बांधकाम सुरु होतं. तिथे विजेचं आणि वेल्डिंगचं काम सुरु होतं, त्यादरम्यान ही आग लागली असावी असा अंदाज महापौर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.  ज्या पाच लोकांचे मृतदेह सापडले ते सर्व निर्माणाधीन इमारतीत काम करणारे मजूर असावेत अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

या पाच जणांचा मृत्यू

महेंद्र इंगळे, प्रतिक पाष्टे (रा. पुणे), रामाशंकर हरिजन, बिपीन सरोज (दोघेही रा. उत्तर प्रदेश), सुशीलकुमार पांडे (रा. बिहार) या पाच कामगारांचा मृत्यू झाला आहे.

त्या मजल्यावर मशनरी नव्हत्या

आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. फर्निचर, वायरिंग केबल्स जळून खाक झाले. आग लागलेल्या मजल्यावर कोणत्याही महत्त्वाच्या मशनरी नव्हत्या, अशी माहिती अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी दिली.

वेल्डिंग, इलेक्ट्रिकल काम सुरू होते

या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर वेल्डिंग आणि इलेक्ट्रीकल काम सुरू होते. त्यामुळे शॉर्टसक्रीट किंवा वीजेची ठिणगी पडल्यामुळे आग पसरल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ असण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, या आगी संदर्भात सखोल चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. आगीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, आमदार चेतन तुपे, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट दिली.

अत्यंत दुःखद घटना

सिरममधील आगीबद्दल चिंता व्यक्त करतानाच या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुःखद घटना आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.  पंतप्रधानांनी सिरमचे अदर पुनावाला यांनाही फोन करून दुर्घटनेची माहिती घेतली.

उत्पादनावर परिणाम नाही

या आगीचा कोणताही परिणाम कोविशिल्ड लस निर्मितीवर होणार नाही. कोविशिल्डचे उत्पादन सुरूच राहील, असे सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर मृतांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या