
कोरोना काळातदेखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये यादृष्टीने व्यवस्था निर्माण करा. संभाव्य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग- क्षेत्रासाठीदेखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालया- मार्फत याचे नियंत्रण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीआयआयच्या पदाधिकाऱयांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे चर्चा केली. कोविड काळात उत्पादन न थांबविता उद्योगांचे व्यवहार सुरू राहिले हे उदाहरण महाराष्ट्राने देशाला घालून द्यावे. छोटय़ा-मोठय़ा उद्योगांमध्ये कोविडपासून प्रभावित न होणारी बायो बबल यंत्रणा निर्माण करून त्या माध्यमातून आरोग्याचे नियम पाळून सुरक्षित उत्पादन सुरू ठेवता आले पाहिजे. काटेकोर निर्बंध लावावे लागले तर उत्पादनावर परिणाम होऊ नये म्हणून कामगारांच्या निवासासाठी कंपनीच्या परिसरात किंवा जवळपास फिल्ड निवास व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कामगारांचे लसीकरण करा!
उद्योगांनी त्यांच्या कामगार व कर्मचाऱयांचे लसीकरण मोठय़ा प्रमाणावर करून घ्यावे. आजमितीस केंद्राने दिलेला 25 लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. तो मोठय़ा प्रमाणावर वापरला गेला पाहिजे, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी केल्या.






























































