मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकणात; रत्नागिरी, सिंधुदुर्गात होणार जोरदार स्वागत

906

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्यापासून दोन दिवसांच्या कोकण दौर्‍यावर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कोकणात येणार असल्याने कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिह्यात त्यांचे जल्लोषात स्वागत होणार आहे. दोन दिवसांच्या दौर्‍यादरम्यान ते गणपतीपुळ्यातील गणपती आणि आंगणेवाडीतील भराडी देवीचे दर्शन घेणार आहेत. तसेच सिंधुदुर्ग किल्ला आणि चिपी विमानतळाच्या कामाची पाहणी व इतर विकासकामांचा आढावा घेणार आहेत.

सोमवारी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने गणपतीपुळे येथे आगमन होणार आहे. सर्वप्रथम ते गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. श्रीदेव गणपतीपुळे देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येईल आणि त्यानंतर गणपतीपुळे विकास आराखडा कामाच्या भूमिपूजन कोनशिलेचे त्यांच्या हस्ते अनावरण होईल. यावेळी शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड. अनिल परब, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित राहणार आहेत. गणपतीपुळे येथून निघाल्यानंतर उद्धव ठाकरे हे दुपारी दोनच्या सुमारास मालवणच्या आंगणेवाडी येथे भराडी मातेचे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ते सिंधुदुर्गनगरी येथे जिह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत.

मंगळवार 18 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे हे सकाळी नऊ वाजता रत्नागिरी जिह्याचा आढावा घेणार आहेत. दोन्ही जिह्यांचे पालकमंत्री तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री दादा भुसे आदी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे हे सकाळी सिंधुदुर्गनगरी येथून हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर चिपी विमानतळाच्या कामाची पाहणी करून विमानतळासंदर्भात बैठक घेणार आहेत, अशीही माहिती जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या