कायद्या सुव्यवस्था राखण्यात हे सरकार कमी पडणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री झालेल्या गोळीबाराची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. नागपूरच्या आयुक्तांना स्वतः बोलवून त्यांना याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. या गोळीबाराचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला असून राज्यात कोणीही गुंडगिरी केली तर त्याचा मुलाहिजा हे सरकार ठेवणार नाही. कायदा सुव्यवस्था राखण्यात कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेत स्थगन प्रस्तावावर उत्तर देताना दिली.

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महापौरांवर झालेल्या गोळीबाराच्या विषयावर स्थगनची मागणी केली होती. यावर तितक्याच तत्परतेने उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उभे राहिले. उद्धव ठाकरे म्हणाले, गेली काही वर्षं मी मुंबईत राहून नागपूरच्या कायदा-सुव्यवस्थेविषयीच्या बातम्या ऐकत होतो. एकूणच नागपूरमध्ये गुन्हेगारी किती वाढली आहे हे ऐकून धक्का बसत होता. दुर्दैवाने काल जी घटना घडली आहे त्याबद्दल मी नागपूरच्या पोलीस आयुक्तांना बोलावून घेऊन माहिती दिली आणि हा तपास नागपूर गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आलेला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. कायदा-सुव्यवस्था राखण्यात हे सरकार कुठेही कमी पडणार नाही. गुंडगिरी कोणीही केली तरी त्याचा मुलाहिजा हे सरकार ठेवणार नाही, अशी ग्वाहीच मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या उत्तराचे विधान परिषद सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले. आमदार भाई जगताप म्हणाले, पाच वर्षं मी या बाजूला होतो. 289च्या सूचनेला कोणत्याही मंत्र्यांनी असं उत्तर दिलेलं नाही. मी स्वागत करतो मुख्यमंत्र्यांचे की, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  त्याच्यावर तत्काळ नवीन परंपरा मुख्यमंत्री महोदयांनी सुरू केली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो.

घटना काय?

मोटरसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर देशी कटय़ातून बेछूट गोळीबार केला. गोळ्या गाडीवर लागल्याने जोशी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्लेखोरांनी एकामागोमागएक अशा चार गोळ्या झाडल्या आणि पसार झाले. ही घटना अमरावती आऊटर रिंग रोडवर मंगळवारी मध्यरात्री 12 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. महापौर संदीप जोशी वर्धा मार्गावरील जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूटनजीकच्या रसरंजन धाब्यावरील स्वतःच्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून 12 च्या सुमारास कुटुंबिय व आपल्या मित्रासह नागपूर शहराकडे परत येत होते. धाब्यावरून 7 गाडया नागपूरच्या दिशेने निघाल्या. त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळीच्या गाडया पुढे होत्या. तर सर्वात मागे जोशी यांची गाडी होती. संदीप जोशी फॉर्च्युनर गाडी चालवित होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूटनजीकच त्यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछुट गोळीवार केला. हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या.