महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्धार

एरियल फोटोग्राफी करताना संपूर्ण महाराष्ट्र फिरलो. राज्यातले हे वैभव आणि सौंदर्य डोळ्यांत मावत नाही. ते जगापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी पर्यटनस्थळांचा केवळ विकास करून चालणार नाही. तर त्यांची इत्थंभूत माहिती आणि सोयी-सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्या लागतील. गुंफा, गडकिल्ले, वन्यप्राणी, वाघ, समुद्रकिनारे, जंगले हे राज्याचे वैभव आहे. हे वैभव जगापर्यंत पोहोचवून महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू, असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जागतिक पर्यटनदिनानिमित्त केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसिडेन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्याचे सौंदर्य आणि वैभव डोळ्यांत मावत नाही. हे वैभव जगापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. राज्यातील फक्त पर्यटनस्थळांचा विकास करून चालणार नाही. तिथे जायचे कसे, राहायचे कुठे, जवळची रेल्वे स्थानके, विमानतळ, त्या पर्यटनस्थळास भेट देण्याचा योग्य काळ कोणता आदी इत्थंभूत माहिती आणि सोयी-सुविधा आपल्याला पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्या लागतील. आमच्या शासनाने कामकाज सुरु केल्यानंतर लगेच रायगडच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांचा निधी दिला. कोकणातील चिपी विमानतळही आता लवकरच सुरू होत आहे.

या कार्यक्रमास महसूल मंत्री  बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, पर्यटन संचालक दिलीप गावडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी अदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते.

पर्यटन डेटा बँक पुस्तकाचे प्रकाशन

राज्यातील पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्त्वाची हॉटेल्स, रिसॉर्टस्, न्याहरी-निवास, जिल्हा पर्यटन आदींची माहिती देणाऱ्य़ा ‘महाराष्ट्र टुरीझम-समथिंग फॉर एव्हरीवन’ या महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक पुस्तकाचे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

14 हेक्टरवर साकारले ग्रेप पार्क

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फ त (एमटीडीसी) नाशिकमधील गंगापूर धरण येथे सुमारे 14.48 हेक्टर क्षेत्रावर पर्यटन सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. यातील एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्टद्वारे पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या रिसॉर्टमध्ये 4 ट्विन व्हीला (प्रत्येकी 3 कक्ष), 28 पर्यटक कक्ष, उपाहारगृह, जलतरण तलाव, सभागृह, स्वागतकक्ष, प्रतीक्षा कक्ष व इतर मुलभूत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच याच परिसरात असलेल्या बोट क्लबमधील 11 बोटी प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येत आहेत.

खारघरमध्ये एमटीडीसी रेसिडन्सी

खारघर (नवी मुंबई) येथील सेक्टर-12 मधील सुसज्ज अशा चार मजली ‘एमटीडीसी रेसिडेन्सी’ हे संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलात 27 कक्ष, 2 लोकनिवास, सोविनियर शॉप, उपाहारगृह, व्यायामशाळा, सभागृह, अंतर्गत खेळ, स्वागत कक्ष आदी सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबई परिसरात असलेल्या सिडको, एमआयडीसी आणि खासगी उद्योगांमुळे विविध कामांसाठी येथे येणाऱ्य़ा व्यावसायिक पर्यटकांची संख्या मोठी आहे तसेच नजीकच्या काळात नवी मुंबई विमानतळ विकसित होत आहे. याअनुषंगाने एमटीडीसीने हे पर्यटक संकुल विकसित केले आहे.

ग्रामीण पर्यटनाला चालना – आदित्य ठाकरे

ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. कोकणात आता हॉटेल ताज गुंतवणूक करत आहे. येत्या काळात तिथे दोन पंचतारांकित हॉटेल्स सुरू होतील. राज्यातील समुद्रकिनाऱ्य़ांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी बीच शॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय कॅराव्हॅन टुरिझम आणि साहसी पर्यटनाच्या धोरणावर काम सुरु आहे. वन आणि जलसंपदा विभागाबरोबर समन्वय करून इको टुरिझम, पक्षी निरीक्षण, ट्रेकिंग, सायकिंलग आदी उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. वन विभागाच्या गेस्ट हाऊससंदर्भातही चर्चा सुरू असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या