शिवसेनाप्रमुखांनी प्रखर हिंदुत्वाचा विचार पुढे नेला – योगी आदित्यनाथ

1871

छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा संकल्प आणि पराक्रम प्रेरणा देणारा आहे. हाच विचार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे नेण्याचे कार्य केले आहे. शिवसेना-भाजपा महायुती हाच विचार पुढे घेऊन जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला सुरक्षीत व मजबुत बनवले आहे. यासाठी शिवसेना-भाजपा महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करुन विकास, सुशासन, सुरक्षा व राष्ट्रवादाला साथ द्या’, असे जबरदस्त आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंगोलीत आयोजीत जाहीर सभेत बोलताना केले.

हिंगोली येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या मैदानावर भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रचारासाठी रविवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भव्य जाहीर सभा संपन्न झाली. या सभेला आमदार तानाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजाननराव घुगे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, माजी सभापती रामेश्वर शिंदे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य व पराक्रमाचे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण नेहमीच झाले आहे. संत नामदेव महाराज व राष्ट्रऋषी भारतरत्न नानाजी देशमुख यांची जन्मभुमी असलेल्या हिंगोली जिल्ह्यात आपल्याशी संवाद साधतोय हे माझे भाग्य आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विरोध असूनही काँग्रेसने कश्मीरसाठी 370 कलम देऊन विशेष दर्जा दिला होता. जातीच्या आधारावर समाजाला तोडण्याचे पाप काँग्रेसने केले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी 370 कलम हटवून देश एकसंघ करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न साकार केले आहे.

yogi-rally

15 वर्ष सत्तेवर असलेल्या काँग्रेसने महाराष्ट्रात बेईमानी व भ्रष्टाचार करताना शेतकऱ्यांचे अनुदान हडपणे, बेरोजगार युवकांना नोकरी देतांना सौदेबाजी करणे, विकासाच्या नावाखाली ठेकेदारांकडुन लुट करणे, हेच काम केल्याचा आरोप आदित्यनाथ यांनी केला. तर भाजपा-शिवसेना महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिक सुखी होण्यासाठी काम केले आहे. समाजाला एकत्र जोडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. विकास, सुशासन, सुरक्षा, राष्ट्रवाद हे मुद्दे घेऊन भाजपा कणखरपणे काम करत असेल तर मत देखील भाजपलाच द्या, असे आवाहन त्यांनी केले. तसेच आमदार तानाजी मुटकुळे यांनी मागिल पाच वर्षात केलेल्या विकासकामाचे कौतुकही योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या भाषणात केले.

तानाजी मुटकुळे, संतोष बांगर यांना विजयी करा
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाषणाच्या शेवटी हिंगोलीतील महायुतीमधील भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळे आणि शेजारच्या कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील महायुतीमधील शिवसेनेचे उमेदवार संतोष बांगर यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला.

आपली प्रतिक्रिया द्या