एसटी कर्मचारी अजूनही ‘डीए’च्या प्रतीक्षेत; मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच विरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱयांना सरकारी कर्मचाऱयांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात केली होती; पण अद्याप चार टक्के महागाई भत्ताही एसटी कर्मचाऱयांना मिळालेला नाही, असा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे.

एसटी कर्मचाऱयांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता अगोदरपासूनच दिला जातो. पण तरीही एसटी कर्मचाऱयांना शासनाप्रमाणे महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र त्यात नवीन काहीच नाही. प्रत्यक्षात देय असलेला  4 टक्के प्रलंबित महागाई भत्ता अजूनही प्रलंबित आहे. ही एसटी कर्मचाऱयांची शुद्ध चेष्टा असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला.

 

एसटी महामंडळ अजूनही तोटय़ात

एसटी महामंडळाचे प्रवासी उत्पन्न वाढले असले तरी महामंडळ अजूनही तोटय़ातच चालले आहे. त्यामुळे महामंडळ फायद्यात असल्याचा दावा खोटा आहे; कारण अजूनही भविष्य निर्वाह निधी, उपदान अशी मिळून अंदाजे 750 कोटी रुपयांची रक्कम ट्रस्टकडे भरलेली नाही. तसेच एसटी बँकेच्या कर्मचाऱयांनी घेतलेल्या कर्जाची साधारण 70 कोटी रुपये इतकी रक्कम बँकेला दिलेली नाही. महामंडळ फायद्यात असते तर ही रक्कम प्रलंबित का राहिली असती, असा सवाल श्रीरंग बरगे यांनी केला आहे.

पहिल्या टप्प्यात 200 बसेसपैकी 12 बसेसचा पुरवठा स्विच मोबॅलिटी कंपनीकडून करण्यात आला असून उर्वरित बसेस टप्प्याटप्प्याने मागवण्यात येत आहे तर 700 बसेस कॉसिस मोबॅलिटी कंपनीकडून घेण्यात येणार आहेत, मात्र वर्ष उलटून गेले तरी कॉसिस मोबॅलिटी कंपनीने एकाही बसचा पुरवठा केलेला नाही. त्यामुळे बेस्ट आता कॉसिस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे.