संगमेश्वर तालुक्यात सीएनजीचा तुटवडा; पंपावर गर्दी, महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात हजारो चाकरमानी दाखल झाले असून, मुंबई गोवा महामार्ग वाहनांनी गजबजलेला आहे; मात्र मोठ्या प्रमाणावर मुंबई-पुण्याहून वाहने दाखल झाल्याने संगमेश्वर तालुक्यातील सीएनजीचा फार मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. महामार्गावर धामणी आणि डिंगणी येथे असणाऱ्या सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

शिमगोत्सव हा कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या लाटेमुळे हा सण उत्साहात साजरा झाला नाही. मात्र आता कोरोनाचा धोका टळल्यामुळे व निर्बंध शिथिल झाल्यामुळे दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात कोणातील शिमगोत्सव साजरा होत आहे. यासाठी मुंबई, गोवा, पुणे येथून हजारोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येत वाहने आल्यामुळे संगमेश्वरात सीएनजी पंपावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे तीन ते चार तास वाहने रखडत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील धामणी येथे असणाऱ्या सीएनजी पंपाच्या बाहेर अर्धा किलोमीटरपेक्षा लांब वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसत आहे.