इथे स्मशानात भरतोय विद्यार्थ्यांचा ‘क्लास’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

सुरतमध्ये कोचिंग क्लासला लागलेल्या आगीत 22 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव तिथले कोचिंग क्लासेस बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोचिंग सेंटर संचालकांसमोर कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यांनी उद्यानं, मोकळी जागा, सरकारी कार्यालयाचा परिसर एवढंच नव्हे, स्मशानातही क्लास सुरू केला आहे.

सुरत दुर्घटनेनंतर गुजरात राज्यातील हजारो टय़ुशन क्लासेसचे शटर डाऊन झाले आहे. फक्त अग्निसुरक्षा नियमांतर्गत फिट बसणाऱया कोचिंग क्लासेसना ना हरकत प्रमाणपत्र दिले जात आहे. अनेक क्लासेसना असे प्रमाणपत्र मिळालेले नाही. नगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यामुळे कोचिंग सेंटरच्या संचालकांमध्ये तीक्र नाराजी व्यक्त केली आहे. अहमदाबादमध्ये 2400 हून जास्त क्लास बंद आहेत.

कोचिंग क्लास संचालकांकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मोकळ्या जागी आम्ही क्लास घेतोय. फायर सेफ्टी मानकं असूनही आमच्या सेंटर्सना टाळं ठोकण्यात आलं आहे. – मनोरम यादव, पद्मा इन्स्टिटय़ूट, अहमदाबाद

माझ्या कोचिंग सेंटरमध्ये मी आवश्यक ती फायर सेफ्टी उपकरणं बसवली आहेत. मात्र तरीही सुरत दुर्घटनेनंतर माझा क्लास बंद केला आहे. माझ्या कोचिंग क्लासला अद्याप एनओसी दिलेले नाही. त्यामुळे काही दिवस मी कलेक्टर कपाऊंडच्या हिरवळीवर क्लास घेतला. मात्र तिथे मला क्लास घेण्यास बंदी घालण्यात आली. कलम 144 चे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली मला आणि विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर एका मैदानात मी क्लास सुरू केला, मात्र कडक उन्हामुळे क्लास घेणे अशक्य होऊ लागले. शेवटी स्मशानात क्लास घेण्याची वेळ माझ्यावर आली. मात्र पालकांनी त्याला विरोध केला. – रवी सोनी, परिवार कोचिंग क्लास, पालनपूर