क्विकरवर कुत्रे विकण्याची जाहिरात देऊन लाखोंचा चुना

सामना प्रतिनिधी । पुणे

क्विकर वेबसाईटवर कॉक्रस पॅनीयल जातीचे महागडे कुत्रे स्वस्तामध्ये विकण्याची जाहिरात देऊन अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणा-या एका बंगाली तरुणाला सायबर शाखेने अटक केली आहे. त्याने पुण्यात दहा तर गुजरात, कर्नाटक आणि केरळ येथे चाळीस जणांची फसवणूक केली आहे.

राजन जनार्दन शर्मा (रा. औंध, मूळ-पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. यातील फिर्यादी महिलेचे पती नौदलात अधिकारी आहेत. फिर्यादी त्यांना कॉक्रस पॅनीयल हे उच्च जातीचे श्वान भेट देणार होते. त्यासाठी त्यांनी क्विकरवर जाहिरात पाहिली. त्यावरून शर्माला संपर्क साधला. शर्माने त्यांना ऑनलाइन आठ हजार रुपये भरा, श्वान तुमच्या घरी पोहोचवला जाईल असे सांगितले. पैसे भरूनही अनेक दिवस झाले तरी श्वानचे पार्सल घरी आले नाही. त्यामुळे त्यांनी शर्माशी संपर्क साधला, पण त्याचा नंबर बंद लागला. त्यावेळी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली होती.

सायबर सेलच्या पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांनी तपास केला. आरोपीला औंध येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे दोन मोबाईल, एक लॅपटॉप, एक डोंगल, पाच सीमकार्ड, दोन डेबिट कार्ड जप्त केले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने अनेकांना गंडविल्याचे समोर आले.

धंदा फसविण्याचा…

शर्मा बी. कॉम. पर्यंत शिकला आहे. तो काही काळ गोव्यातही राहिला आहे. सध्या तो पुण्यात औंध येथे १४ हजार रुपये भाड्याने फ्लॅट घेऊन राहत आहे. तो क्विकरवरच्या जाहिरातीवरून लोकांना फसवून पैसे कमवित होता. त्याला गर्लफ्रेंडही आहे. त्याचा महिन्याचा खर्च, घरभाडे, गर्लफ्रेंडचा खर्च तो या फसवणुकीतून भागवित असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दरम्यान, त्याला एका नायजेरियनने अशाच प्रकारे फसवले होते. त्यानंतर त्याला यातून पैसे कमविता येते हे समजले, त्यामुळे त्याने हे गुन्हे केले.

आपली प्रतिक्रिया द्या